पुणे – बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि पीपीसीआर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक दुर्बल घटकांसाठी वज्रनिर्धार मोफत लसीकरण महाअभियानास प्रारंभ झाला आहे. ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रा.स्व.संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ झाला.
भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कोंढवा येथील बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी वज्रनिर्धार मोफत लसीकरण अभियानाचा प्रारंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांच्या हस्ते झाला. पीपीसीआरचे अध्यक्ष सुधीर मेहता, बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिकचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, कार्यवाह बद्रीनाथ मूर्ती, विश्वस्त प्रकाश धोका, सह-कोषाध्यक्ष ॲड सत्यजीत तुपे, डॅा. अजित कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष देशपांडे यांनी प्रास्ताविकात मोफत लसीकरण अभियानाचा तसेच संस्थेच्या अन्य सेवाभावी कार्याचा विस्तृत परिचय करून दिला. पीपीसीआरचे अध्यक्ष मेहता यांनी कोव्हीड महामारीच्या प्रारंभापासून केलेल्या पीपीसीआरच्या कार्याचा आढावा घेतला. कोव्हीड संघर्षात लसीकरण हे प्रभावी हत्यार ठरले आहे, म्हणूनच आर्थिक दुर्बल व गरजू नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचे शिवधनुष्य बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक, सिरम इन्स्टिट्यूट आणि पीपीसीआर यांनी उचलले आहे. हे अभियान पुण्यातील अनेक वैद्यकीय व सेवा संस्था आणि काही सामाजिक संघटना यांच्या सहकार्याने संपूर्ण पुणे महानगरात चालविले जाणार आहे.
भय्याजी जोशी यांनी जागतिक संकटात भारताने केलेल्या यशस्वी संघर्षाशी उपस्थितांना अवगत केले, तसेच या संघर्षातील सांस्कृतिक व सामाजिक योगदान विशद करताना उदारता व कर्तव्य भावना या विशेष गुणांमुळेच भारतीयांना अखिल विश्वात प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचे नमूद केले.
सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी युरोपमधून पाठविलेल्या विशेष संदेशाचे वाचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संपर्क प्रमुख मनोज पोचट यांनी केले. या कार्यात खांद्याला खांदा लावून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठोस आश्वासन संदेशावारे आदर पुनावाला यांनी दिले.
संस्थेचे विश्वस्त प्रकाश धोका यांनी आभार मानले. ॲड. सत्यजीत तुपे यांनी सूत्रसंचालन केले. केदारेश्वर वसाहत, अप्पर इंदिरा नगर आणि येवलेवाडी येथील सुमारे १६० लाभार्थ्यांचे मोफत लसीकरण झाले.