पुणे -अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशात ‘एक गाव-एक तिरंगा’ हे अभियान येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिना निमित्ताने संपूर्ण जल्लोषात साजरा करणार आहे. या अभियानासाठी पुणे महानगरात प्रत्येक चौकात कार्यक्रम करण्याची योजना करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने पुणे महानगरातील अभाविपचे ४ भाग व १२ नगरातील कार्यकर्ते समाजात सक्रियपणे कार्यरत आहेत.
पुणे शहरातील विविध ठिकाणी ११११ सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रम, भारत माता प्रतिमा पूजन व अन्य कार्यक्रम ची योजना केली आहे. ‘घर घर तिरंगा – मन मन तिरंगा’ हे ब्रीद घेऊन घरावर राष्ट्रध्वज लावण्यात येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी अभाविप पुणे महानगराची समिती गठित करण्यात आली आहे, जी वर्षभर विविध कार्यक्रम घेण्याची योजना करणार आहे. या समितीचे अभियान प्रमुख म्हणून सोहम नारकर यांची निवड झाली आहे, तसेच या अभियानात पुणे महानगरातील एकूण ६७७ कार्यकर्ते सक्रिय सहभागी होऊन काम करत आहेत. या अभियानाच्या माध्यमातून उपनगर, वस्ती, कॉलनीतील घरोघरी प्रत्येक नागरिकांन पर्यंत पोहोचून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थी परिषद नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. आगामी वर्षभर विद्यार्थी परिषद देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करणार आहे त्याच प्रमाणे महानगरात विविध ७५ कार्यक्रमांची योजना वर्षभरासाठी करण्यात आल्याची माहिती अभियान प्रमुख सोहम नारकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.
पुणे शहरातील सर्व गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, महिला बचत गट, सामाजिक संस्था व नागरिकांनी या अभियानांतर्गत सार्वजनिक ध्वजारोहण व भारत माता पूजनाचे कार्यक्रम करावेत असे आवाहन अभाविपचे पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी केले. तसेच एक चौक-एक कार्यकर्ता-एक तिरंगा या अभियानाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. यावेळी अभाविपचे तुषार काहूर, हर्षवर्धन हरपुढे, ह्रित्विक किंबहुणे, शुभम बावचकर उपस्थित होते.