पुणे- – जेष्ठ नेते गणपतराव देशमुख( ganpatrao deshmukh ) हे अतिशय विद्वान व्यक्तिमत्व होतं. संयमी, शांत अशी भूमिका त्यांची नेहमीच राहिली आहे. साधेपणाने राहणे आणि कोणाकडेही जाणं ही त्याची खासियत होती. मला गणपतराव देशमुख यांच्याबरोबर 25 वर्षांपेक्षा जास्त काम करायला मिळालं. काही दिवस तर आम्ही दोघंही एकाच बेंचवर बसत होतो. त्याच्या शिकवणीचा खूप मोठा फायदा आम्हा सर्वांना झाला आहे. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीच भरून निघणार नाही, त्यांच्या निधानामुळे महाराष्ट्राने एक भीष्मपितामह गमावला आहे अशी भावना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip valse patil) यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले, गणपतराव देशमुख हे नेहमी तयारी करूनच सभागृहात येत असत. तयारी केल्याशिवाय सभागृहात कधीही आले नाहीत. तयारी करूनच ते आपलं मत सभागृहात मांडत असत. मग ते मत ते सरकारला आवडो किंवा न आवडो…ते नेहेमी अशाच पद्धतीने आपलं मत मांडत असत. मी विधानसभेचा अध्यक्ष असतानाही ते सभागृहात होते. त्यावेळेला त्याच्या उपयुक्त सूचना या सरकारसाठी आणि उपस्थित आमदारांसाठी कायम स्मरणात राहिल्या आहे. अशा आठवणी देखील यावेळी वळसे पाटील यांनी व्यक्त केल्या.
ते राजकारणातील भीष्मपितामह होते किंवा त्यांना युगपुरूष म्हणता येईल. अशा कितीही उपाध्या दिल्या आणि कितीही शब्द वापरले तरी ते त्यांच्यासाठी कमीच आहेत. आज त्यांच्या जाण्याने सगळी जनता शोकसागरात बुडालेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणचा जो चालता बोलता इतिहास होता, १९५२ पासून त्यांनी महाराष्ट्राचं सगळं राजकारण जवळून पाहिलेलं आहे. संघर्षाचं, विकासाचं राजकारण पाहिलेलं आहे. गणपतराव देशमुखांच्या रुपाने महाराष्ट्राने आज एक भिष्मपितामह गमावलेला आहे असे ते म्हणाले.