पुणे- “राजकारण हे विचांरांचं असतं. ते लोकांसाठी करायचं असतं. आजपर्यंत तपास यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी करतात हे यापूर्वी कधी पाहिलं नव्हतं. एखादा मोठा पक्ष देशात एवढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, हे दुर्दैवी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरु असलेल्या ED च्या छापेमारीवरून भाजपाच्या कार्यकारिणीची गुरुवारी झालेल्या बैठकीत अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे, यावर आज सुप्रिया सुळेंनी मत व्यक्त केले.
सुळे म्हणाल्या, यंत्रणांचा गैरवापर आपण पाहात आहोत. पवार साहेबांनाही नोटीस पाठवली होती. राजकारण विचारांचं असावे. मात्र नवी नियमावली यांनी काढली आहे”. हे जाणून बुजून केलं जातं. एखादा मोठा पक्ष देशात एवढी आरोग्याची भयाण परिस्थिती असतानाही सुडाचं राजकारण करत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
भाजपाकडून एजन्सीचा गैरवापर होत आहे. यातून त्यांचे स्टाईल ऑफ ऑपरेशन दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता आल्यापासून आम्ही हे जवळून पाहिलं आहे. भाजपाने पवार साहेबांनाही ईडीची नोटीस पाठवली होती. महाराष्ट्राची संस्कृती आहे की सत्तेचा वापर त्यांनी कधीही विरोधकांना त्रास देण्यासाठी केला नाही. नेहमी विचारांचा राजकारण केले गेले आहे. वैचारिक मतभेद होते. मात्र, कधीही अशा पद्धतीने एजन्सीचा वापर मी बघितला नाही. भाजपाकडून अशा पद्धतीने नवीन एसओपी काढण्यात आली आहे. पण आम्ही त्यांच्या विरोधात लढणार, असे मत यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.भाजपासारख्या पक्षाने सुडाचे राजकारण करणं दुर्दैवी असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
जे वाचनात येतंय त्यावरून भाजपाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातोय हे स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी काम करत आहे. राज्यात कोरोनाच्या महामारीपासून सुटका करण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहे. लोकांची सेवा करण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे. वैयक्तिक सूड घेण्याचा आमचा अजेंडा कधीही नव्हता आणि कधीही असणार नाही, असे मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
लोकांना चर्चा करायला खूप वेळ..आजची बैठक ही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे, हे आधीच सांगण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज दुसरे कार्यक्रम होते म्हणून ते आले नाहीत. लोकांना गॉसिप करायला खूप वेळ असतो, माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असेही त्या म्हणाल्या.
महापौरांना झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा
पुण्यातील आंबिल ओढ्यावरील घरांवर पुणे महापालिकेने कारवाई केली. त्यावरून पोलिस प्रशासन आणि स्थानिक नागरिक आमने- सामने आले होते. या कारवाईवरून प्रचंड गोंधळ उडाला होता. त्यानंतर महापालिका न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली होती. पुणे महापालिकेने केलेल्या कारवाईवरुन, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावर ताशेरे ओढलेत. पुण्याच्या घटनेची चौकशी व्हावी. महापौरांनी उत्तर द्यावे. आंबिल ओढ्यावरील कारवाई कुणी केली हे सर्वांना माहिती आहे. पुणे महापालिकेत सत्ता कुणाची आहे तर भाजपची. त्यामुळे महापौरांना जर झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा” अशी मागणी सुळे यांनी केली.