मुंबई : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यावरून भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला जाबबदार धरले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मराठा आरक्षण रद्द होण्यास जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना मराठा आरक्षण रद्द झाल्याचा निर्णय ऐकून आज आनंद झाला असेल, त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत अशी टीकाही त्यांनी केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. मराठा समाजात मागासलेल्या लोकांप्रमाणे भारतीय घटनेनुसार आरक्षण देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, त्याचवेळी संशय आला होता. तामिळनाडू आणि कर्नाटक दोन्ही राज्यात 52 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. पण मराठा आरक्षण रद्द करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे.
आजही मराठा आरक्षणासंदर्भातील लढा संपलेला नाही. हा लढा मराठा समाज सुरु ठेवणार आहे. काही जण बाहेरुन आरक्षण देत असल्याचे दाखवत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, भारतीय राज्य घटनेनुसार आम्ही लढू आणि आरक्षण मिळवू, असे नारायण राणे यांनी म्हटले.