पुणे- पुण्यातील वानवडी येथे तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेल्या 22 वर्षीय पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी दहा दिवस उलटूनही अद्याप काहीच उलगडा झालेला नाही. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. या प्रकरणाच्या ऑडिओ क्लिप्स सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर अधिक गूढ वाढले आहे. त्यानंतर पूजाने आत्महत्या केली की तिचा खून झाला अशी चर्चा केली जाऊ लागली आहे.
दरम्यान, या प्रकरणात नाव आलेले संजय राठोड यांनी मात्र, अद्याप याबाबत कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ही घटना घडल्यापासून ते नक्की कुठे आहेत याचा पत्ता नाही. त्यांचा फोनही नॉट रीचेबल आहे. त्यामुळे अधिक संशय बळावत चालला आहे. राठोड यांनी 17 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील दांडी मारली होती. मध्यंतरी,या प्रकरणावरून राठोड यांनी राजीनामा दिल्याची चर्चाही प्रसार मध्यमांमध्ये होती.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी भाजप आक्रमक झाला असून सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे, दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेत या प्रकरणाच्या तपासचा अहवाल देण्याचे आदेश पुणे पोलिसांना दिले होते तर राज्याच्या पोलिस महासंचालकांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी झालेल्या तापासचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलिस महासंचालकांना सुपूर्द केला आहे.
या प्रकरणात पूजाच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल नसल्यामुळे अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. केवळ जाब-जबाब घेण्यात आले आहेत. तसेच अधिक तपासासाठी पोलिसांची पथके बीड आणि यवतमाळला पाठविण्यात आली आहेत.ज्यांची सखोल चौकशी करायची आहे अशांना पुण्यात बोलावण्यात आले असून त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, आवश्यकता पडल्यास वनमंत्री संजय राठोड यांचीही चौकशी करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केल्याचे वृत्त टीव्ही9 मराठीने दिले आहे. तसे झाल्यास राठोड यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत.