मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्यावरून आणि विरोधात वक्तव्ये करण्यावरुण गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टितील कलाकार चर्चेत आहेत. दिल्लीत सुरू असलेले शेतकरी आंदोलन, वाढलेले इंधनाचे दर यावरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता नुकटेच कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेले आणि आक्रमक समजले जाणारे नाना पटोले यांनी अभिनेते बीग बी अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय युद्ध रंगले आहे.
तत्कालीन यूपीएचे सरकार हे लोकशाही मानणारे सरकार होते. त्यावेळी पेट्रोल 70 रुपये लिटर झाले तेव्हा अमिताभ बच्चन आणि अक्षयकुमार यांनी या दरवाढीविरोधात ट्वीट करीत संताप व्यक्त केला होता. मग आता पेट्रोलचा दर शंभर रुपये प्रतिलिटरवर पोहोचला असताना अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांच्यासह इतर सेलेब्रिटीही गप्प का? एकानेही याबाबत ट्वीट का केले नाही? असा सवाल करीत हुकुमशाही मोदी सरकारविरोधात बोलण्याची तुमची हिम्मत होत नाही का? असा प्रश्न पटोले यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. अमिताभ आणि अक्षयकुमार यांचे चित्रीकरण आणि चित्रपट बंद पाडू असा इशारा देतानाच,’केंद्रात मानमोहनसिंग यांचे सरकार असताना हीच मंडळी इंधन दरवाढीवरून ट्वीटरवरुन टीव टीव करायची मग आताच गप्प का? केंद्र सरकार विरोधात त्यांनी भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही आक्रमक होऊ, असा इशारा दिला आहे.