पुणे – पिंपरी-चिंचवडमधील एफएफआय चीटफंट कंपनीचे मालक आनंद उनवणे (वय ४५ वर्षे) हे ३ फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. शनिवारी महाड येथील सावित्री नदीत त्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
दरम्यान, आनंद उनवणे यांची हत्या झाल्याचं स्पष्ट दिसत आहे. आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला असून शेजारील राज्यांसोबत मृतदेहाचे फोटे शेअर केले आहेत,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड पोलीस आणि आनंद उनवणे यांचे नातेवाईक रविवारी घटनास्थळी दाखल झाले होते. आनंद उनवणे यांच्या भावाने ५ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक आनंद उनवणे यांची एफएफआय चीटफंट कंपनी आहे. ते तीन तारखेला मध्यरात्री घराबाहेर पडले. दुसऱ्या दिवशी त्यांनी ऑफिसमध्ये फोन करून 40 लाख रुपये मागवून घेतले. त्यानंतर तेथून बेपत्ता झाले. दरम्यान, आनंद उनवणे हे 40 लाख रुपये घेऊन बेपत्ता झाले असल्याचं कुटुंबियांना माहिती मिळताच त्यांनी पिंपरी पोलीस ठाणे गाठले. पैसे घेऊन गेल्याने त्यांनी भीती व्यक्त केली आणि ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. अशी माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे.
आनंद उनवणे यांचा पिंपरी पोलीस शोध घेत असता त्यांचा मृतदेह महाड येथील नदीपात्रात आढळला, अशी माहिती त्यांच्याच नातेवाईकांनी दिली आहे. त्यानंतर पिंपरी पोलीस आणि नातेवाईकांनी त्या ठिकाणी जाऊन मृत आनंद उनवणे यांची ओळख पटवली. आनंद यांचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला असून ते एका विवाहित महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते, अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, आनंद उनवणे यांचा खून का आणि कोणी केला याचे उत्तर अनुत्तरित असून पिंपरी पोलीस उलट तपास करण्याच्या तयारीत असल्याचं सांगण्यात येत आहे.