पुणे -वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्हय़ात लॉकडाउनऐवजी कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर हॉटेल, दुकाने, मॉल रात्री दहानंतर बंद ठेवली जाणार असून, विवाह समारंभ व इतर सार्वजनिक कार्यक्रमांना 50 लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. दरम्यान, जिह्यात ‘कोरोना’ बाधितांची संख्या वाढत असून, कोरोना संसर्गाबाबत दक्षता वा नियम न पाळणाऱयांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी या वेळी दिले.
येथील विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, जिह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नागरिक अद्यापही पुरेशी काळजी घेत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बाधितांची साखळी तोडण्यासाठी निर्बंधाचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून चाचण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱयांमार्फत गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करा.
पुण्यातील शाळा-महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहतील. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थांना यातून सूट देण्यात येईल. हॉटेल्स दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. तर होम डिलीव्हरी 11 वाजेपर्यंत करता येईल. त्याचबरोबर लग्न समारंभ, धार्मिक विधी, कुठलेही सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त पन्नास लोकांनाच परवानगी असेल. नियम न पाळणाऱयांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. पुण्यातील बागा फक्त सकाळी सुरू राहतील, तर संध्याकाळी बंद राहतील. रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. एमपीएससीचे कोचिंग क्लासेस आणि ग्रंथालयात पन्नास टक्के क्षमतेनुसार विद्यार्थांना उपस्थित राहता येईल.
चंद्रकांतदादांनी घेतली अजितदादांची भेट
बैठकीपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेतली. पुण्यातील लॉकडाउनसंदर्भात या भेटीत चर्चा झाली. कोरोनालसीकरण अजूनही काही महिने चालणार आहे. त्यामुळे काही गोष्टी बंद करणे व लॉकडाउन करणे यापेक्षा गर्दीवर मर्यादा आणणे तसेच खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे चंद्रकांतदादांनी या वेळी सांगितले.