पुणे- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. स्वत: धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यावरून राज्याच्या राजकारणात गदारोळ उडाला आहे. विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या आरोपाबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष म्हणून या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शरद पवार यांनी त्यांची धनंजय मुंडे यांच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे असून त्यावर पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल,” असं म्हटलं आहे. आता शरद पवार यांच्या या वक्तव्यावरून राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
शरद पवारांनी हा गंभीर गुन्हा आहे असं म्हटलंय, हा गंभीर गुन्हा कसा घ्यायचा हे मुंडेंनी ठरवावं,त्यांना त्यांची आणि पक्षाची इभ्रत राखायची असेल तर राजीनाम्या शिवाय दुसरा काय पर्याय आहे? असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
औरंगाबादच्या नामांतराच्या प्रश्नावरून राजकीय वादंग सुरु असताना आता उस्मानाबादच्या नामांतरावरून राजकीय वादळ उठले आहे याबाबत विचारले असता आंबेडकर म्हणाले, सरकार टिकवायचे की नाही टिकवायचे हे उद्धव ठाकरे यांनी ठरवले पाहिजे. नामांतरच्या मुद्द्यावरुन भांड्याला भांडे लागतीलच , घरातील नीती तीच राजकारणातील नीती असते अशी टिप्पणी त्यांनी केली. दरम्यान, औरंगाबादच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे वर्ष- दोन वर्ष तिथे निवडणुका होतील की नाहे हे सांगता येत नाही असे आंबेडकर म्हणाले.
पुण्याचे नाव बदला असे मी म्हणालो नव्हतो तर संभाजी महाराजांची दफन भूमी असल्यामुळे त्यांचे नाव पुण्याला द्यावे असे मी म्हणालो होतो असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.