पुणे- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत जन्मदात्या पित्याने आपल्या दोन महिन्याच्या चिमुकलीचा नाक आणि गळा दाबून निर्दयीपणे हत्या केल्याची घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे घडली आहे.
याप्रकरणी चिमुकलीची आई सोनम शक्तिमान काळे यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सकटया उर्फ शक्तिमान काळे असे आरोपीचे नाव आहे. हे दाम्पत्य उसतोड कामगार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील करेवाडी येथे ऊस तोडणीसाठी शक्तिमान काळे व त्याचे कुटुंब आले होते. आरोपीचे 22 नोव्हेंबरला सोनम यांच्यासोबत भांडणे झाली. त्यात. दोन महिन्यांपूर्वी जन्मलेली मुलगी माझी नाही असे सांगत आणि आज तू ऊसाच्या मोळ्या बांधायला का आली नाहीस याचा जाब विचारत पत्नी सोनम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात सुरुवात केली. तसेच दुसऱ्या दिवशी पहाटे आरोपी काळे याने आपल्या चिमुरडीचे तोंड आणि नाक दाबत असतानाच बाळाच्या रडण्याच्या आवाजाने सोनम यांना जाग आली. यावेळी त्यांनी घराबाहेर येत आरडाओरडा केला. इतर ऊस तोडणी कामगार मदतीला येईपर्यंत काळे फरार झाला होता. आपल्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर सोनम यांना या घटनेचा जबर धक्का बसला.व त्यांनी शुक्रवारी इंदापूर पोलिस ठाण्यात पोलिसांना सर्व प्रकार सांगितला.