आधुनिक वाल्मिकी… ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती।।’


आधुनिक वाल्मिकी अर्थात ग. दि. माडगूळकर यांचा आज (ता. १४ डिसेंबर) हा पुण्यस्मरण दिन त्या निमित्ताने त्यांच्या स्मृतीला अभिवादन...

रामायणातील कथांचा आणि त्यातील आदर्शवत समाज जीवनाची संमोहित करणारी वाटचाल सर्व विश्वाला प्रेरित करत होती. सुमारे ६५ वर्षापूर्वी म्हणजेच दिनांक एक एप्रिल १९५५ रामनवमीला पुणे आकाशवाणीवरून रसिकांच्या हृदयाचा ठाव घेणारी एक अजोड रामकथा म्हणजे ५६ गीतांची मालिका असलेले ‘गीत रामायण’  यातील पहिले गीत सादर करण्यात आले आणि पुढे दर आठवड्याला एक गीत याप्रमाणे रसिकांच्या भेटीला येत गेले. या गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात सादर झाले व अजूनही होत आहेत. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले.

स्वये श्रीरामप्रभू ऐकती। कुशलव रामायण गाती।।’ 

अधिक वाचा  पंचांगकर्ते, खगोलविद, गणित संशोधक : टिळक

हे पहिले स्वरपुष्प उमलले व कालांतराने या ५६ पुष्पांचा सुगंध आकाशमार्गे सर्वदूर पसरला. विज्ञान व श्रद्धा यांचा समन्वयाने घडलेल्या या संमोहनाने गेली अनेक वर्षे समाज जीवनावर गारूड केले आहे. गदिमा आणि सुधीर फडके यांच्या प्रतिभेच्या बहरकाळातला मोहर म्हणजे ‘गीत रामायण’.  दोहोंच्याही सर्जनशीलतेच्या चरमसीमेची मोहर या गीतांवर उमटली आहे. भारतीयांच्या भावगुंफेत शतकानुशतके विराजमान असलेल्या ‘श्रीराम’ या आदर्श समाजरचना उभी करणार्‍या व्यक्तिरेखेस गदिमांनी भावपूर्ण शब्दात गुंफले व एक प्रकारे अजरामर साहित्य वाङ्ममयाचे सकळ सार या गीतात मांडले. तरीही ते तुकोबायांसारखे ‘वदवी गोविंद तेचि वदे’ अशा नम्रतेने या अलौकिक ‘अमृतसंचया’चे मातृत्व स्वीकारतात. जगातील कुणीही रामकथा वाचली तर त्याला ती आपलीशी वाटेल. अर्थात हेच कुठल्याही महाकाव्याचे वैशिष्टय़ असते. गदिमांनी हेच वैशिष्टय़ ओळखून या महाकाव्याला साधे सोपे बनवले व सामान्यांच्या जीवनाशी त्याचे नाते जोडले. हीच ‘गीतरामायणा’ची अद्भुतता! गदिमांची लेखणी शतकांचे अंतर कापते व आपल्या चरित्रनायकाचा वा नायिकेच्या मानसिकतेचा अचूक वेध घेते. ‘लीनते, चारुते, सीते’  वा ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत. दशरथाच्या देहप्रयाणाची वार्ता ऐकल्यानंतर ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ हा भरताला केलेला उपदेश केवळ तत्त्वज्ञान राहात नाही. धीरोदात्तपणे दु:ख सहन करूनही दुर्बल न बनता कर्तव्य व कर्तृत्व यांची सांगड घालून रामायण कसे घडवावे, याचा सामान्य जीवांना दिलेला तो राममंत्रच बनतो. 

अधिक वाचा  जात आणि समाज : समज आणि गैरसमज...

 कर्तव्याच्या कठोर हाकेला साद देऊन सत्तेची संगत व नात्यांची निकटता निग्रहाने नाकारून वनवासाची वाटचाल पुढे सुरू ठेवणारा राम एका महाकाव्याचा विषय न बनला तरच नवल! हा महानायक व त्याला शब्दांकित करणारा महाकवी या दोहोंनाही शतशः प्रणाम! महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांनी टिळक वाड्यातील समारंभात गदिमांना ‘आधुनिक वाल्मिकी’ ही पदवी बहाल केली. साक्षात स्वातंत्र्यवीर सावरकर गदिमांना म्हणाले, ‘आजच्या पिढीत तुमच्या योग्यतेचा दुसरा कवी नाही.’ 

गेली अनेक शतके रामायणातील घडलेल्या घटनांचे महाकाव्य दर्शन समाजमनावर प्रतिबिंबित करणार्‍या ऋषीतुल्य व्यक्तिंच्या आशिर्वादाने प्रभू रामचंद्र यांचे भव्य दिव्य मंदिर अयोध्येत अनेक वर्षाच्या संघर्षातून उभे राहत आहे. राममंदिर उभे राहणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही परंतु राष्ट्रमंदिर उभारणी हाच संकल्प प्रत्येक रामभक्ताने करणे हीच आधुनिक वाल्मिकी गदिमांना आदरांजली!

अधिक वाचा  केवल ज्ञानी भगवान महावीर

विवेक(आप्पा)जोशी

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love