ईडा पीडा टळुन पुन्हा परत सर्व मंगल होऊ दे


आयुष्यातील साठ पासष्ट वर्षात पहिल्यांदाच कोरोना हा शब्द ऐकला. खूप मजा वाटली. आम्ही मैत्रिणी एकमेकींना काहीच करू नका ना? म्हणुन हसत होतो. 25 मार्च ते 17 एप्रिल पर्यंत बाहेर पडू नका, हात धुवा,मास्क लावा हे ऐकून फारसे या रोगाचे गांभीर्य वाटले नाही.  पंधरा वीस  दिवस घरात राहावयाचे. हा हा म्हणता  दिवस जातील आणि परत सारे सुरळीत होईल असे वाटले. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसे रोगाचे गांभीर्य कळु लागले आणि लॉकडाऊन,क्वारंटाईन,अनलॉक या नवीन शब्दांची ओळख झाली.

टीव्हीवर रोज रोज त्याच बातम्या ऐकावयास मिळु लागल्या.चीन,अमेरिका ,फ्रांसचा आकडा पाहून हा कसला रोग, किती माणसे जात आहेत, याला कधी औषध मिळणार, हे किती दिवस चालणार असे अनेक प्रश्न पडू लागले आणि उत्तरही सापडेना.सगळे हवालदिल झाले. पण जास्तीत जास्त काळजी घेऊन जीव वाचवुयात ही जिद्द वाढली.   

बघता बघता भारतातील संख्याही झपाट्याने वाढू लागली. इंग्रजांच्या वेळेस असेच प्लेग ने थैमान घातले होते  ते आठवले.  ते नुसतेच ऐकले होते पण हे प्रत्यक्षात पहावयास मिळत आहे  आणि जीव दडपून जात होता. सरकार, पोलीस, डॉक्टर, नर्स, बँकेतील लोक मदतीला सज्ज झाले.सैनिक सीमेवर दक्ष असतात तसेच डॉक्टर,नर्स, सरकार सारेच जिवाचे रान करत होते. जणू सारी जनता युद्धाला सज्ज झाली होती .पण नदीला महापूर यावा व  गावे नष्ट व्हावीत  किंवा आभाळच फाटल्यागत  तसे झाले होते.सारे घरातच बसून सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत होते. सारे एकमेकांना धीर देत होते. जपायला सांगत होते.

अधिक वाचा  सावरकर समजून घेताना भाग 2 (पूर्वार्ध): वि. दा. सावरकर - माफीवीर की राष्ट्रवीर

पहिल्यांदा लॉकडाऊन उठला तेव्हा कोरोना ची वाढती संख्या ,मृत्युचे वाढते प्रमाण ,लोकांचे गावी जाण्याची घाई करणारे लोंढे,त्यातच आलेले  चक्रीवादळ, नद्यांना आलेले पूर, होणारी वाताहत सारेच अनाकलनीय होते. मती बधीर झाली होती. पण आता हळू जीवन पूर्वपदावर येत आहे. पाच महिने झाले आहेत. आता सारे आबालवृद्ध कंटाळु लागले आहेत.सर्वजण हे कधी संपणार म्हणून हवालदिल झालेत.

पण यातूनच काही चांगले घडते आहे घरात बसलेले कलाकार नवीन संकल्पना सुचून  विचार करत आहेत. तेही घरात बसूनप्रसंगी रिस्क घेऊन आपल्या करमणुकीसाठी सार्‍या अटी मान्य करून सज्ज झालेत. नवीन सिरीयल व जुन्या चे नवीन भाग तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. तसेच विष्णुपुराण ,रामायण, महाभारत, जय हनुमान हे धार्मिक भाग दाखवत आहेत त्यामुळे आपल्याला घरात बसून सर्व  मिळत आहे व वेळही जात आहे.

अधिक वाचा  केशवम स्मरामी सदा परमपूजनीयम !!!

एरवी  कामानिमित्त बाहेर राहतात ते आता  घरातील लोकांशी संवाद करत आहेत. घरातुनच काम असल्यामुळे सारे सुरक्षित आहेत.परगावी  असलेल्यांसाठी व्हीडीओ आहेच. त्यामुळे रोज बोलता येते व पाहता येते.ते सुखरूप आहेत हे काय थोडे समाधान आहे .घरी बसून मुलांच्या शाळा बघता येतात. शिवाय फावल्या वेळात वाचन, बुद्धिबळ, कॅरम ,पत्ते आहेतच की आता ईतके  दिवस धीर धरला तर आणखी थोडे दिवस धीर धरा.  आता बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे .सरकार ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत .गरीबांना मोफत धान्य ,व्यवसायिकांना कमी व्याजात कर्ज ,टपरी धारकांना विनातारण कर्ज, बँकेतील कितीतरी कर्मचारी पाच महिने घरीं न येवुन हे काम करताहेत .दुकाने बंद झाली तरी बँका उघड्याच.हे ही लक्षात घेतले पाहिजे. आता आपणास हे सारे फुल ना फुलांची पाकळी वाटते.पण 130 कोटी लोकसंख्येला सरकार होईल तशी मदत करत आहे.आपण देशाचे नागरिक म्हणून आपले काही कर्तव्य आहेच की, आपण सीमेवर जाऊ शकत नाही ,आपण लोकांना मदत करू शकत नाही. हे मान्य! पण आपण सर्वांनी घरात बसून ,सुरक्षित अंतर ठेवून, सर्व सूचना पाळून डॉक्टर ,नर्स, पोलीसांना प्रोत्साहन देऊन कौतुक करू शकतो.

अधिक वाचा  #National Security Day :आज (४ मार्च) राष्ट्रीय सुरक्षा दिवस : काय महत्व आहे या दिवसाचे?

मला तर वाटते आपण आपल्याला सांभाळणे हे एक युद्धच आहे. प्रत्येक क्षेत्रात काही फायदा काही तोटा असतोच .तसेच सर्व क्षेत्राला  फटका बसलेला आहेच होऊन गेलेल्या गोष्टीवर चर्चा  करून काय फायदा. जे होणार ते चांगलेच होणार असा विश्वास बाळगुयात. चला तर मग आपण सारे या युद्धाला सामोरे जाऊ या व जिंकून दाखवुया. हीच या देऊळबंद देवांना, येणाऱ्या गणरायाला प्रार्थना करूयात. हे कोरोनाचे अरिष्ट लवकर जाऊ दे. ईडा पीडा टळुन  पुन्हा परत  सर्व मंगल होऊ दे.

          श्रीमती विमल पाटील, पुणे

            7517406253

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love