पुणे – हिम्मत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी कोंग्रेस आयन कॉँग्रेसने स्वतंत्र लढावं असं आव्हान देत आणखी पाच वर्षे सरकार चालवलं तर प्रखर विरोधी पक्ष म्हणून तुमची झोप हराम करण्याची आमची ताकद आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
पुण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते.पाटील म्हणाले, आमची सर्व गोष्टींची तयारी आहे, पण तुमच्यातच हिम्मत नाही. हिम्मत असेल तर वेगवेगळे लढा. कशाचा काशाला पत्ता नाही, झेंडा वेगळा तत्व वेगळे आणि एकत्र लढणार. त्याचा आम्हाला काही फरक पडणार नाही. खासदार राऊत यांनी आज पुण्यामध्ये ही सरकार 15 दिवसात कोसळेल यासाठी पैंजा लावण्यात आल्या होत्या असे सांगितले. तसेच ही सरकार पांच वर्षे टिकेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पाटील यांनी टीका केली.
दरम्यान, भाजपवर टीका करणे ही संजय राऊत यांचे कामच आहे. त्यामुळे आजचे त्यांचे पक्षातील स्थान आहे, असे सांगत त्यांनी टीका केली तर आश्चर्य वाटत नाही, आमच्यावर अनेकदा अग्रलेखही असतात असे पाटील म्हणाले.
दरम्यान, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कामाबद्दल स्तुति केली होती. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. याबाबत बोलताना पाटील म्हणाले, त्यात काही वावगं नाही. ही महाराष्ट्राची संस्कृति आहे. मी देखील अनेकवेळा या वयात ते किती प्रवास करतात, त्यांच्या शेती आणि सहकारातील ज्ञानासंबंधी सांगत असतो. आम्ही मंत्री असताना फोन करायचो. ही महाराष्ट्राची संस्कृति आम्ही उचलली परंतु महाविकास आघाडी ते विसरले. फडणविसांनी घेतलेले निर्णय त्यांनी रद्द केले अशी टीका त्यांनी केली.