उस्मानाबाद _ “जलयुक्त शिवारची चौकशी जरूर करावी. यातील कोणतेच काम मंत्रालयातून मंजूर झालेले नाही. स्थानिक स्तरावर कामांच्या मंजुरीचे अधिकार देण्यात आले होते. सुमारे ६ लाखांवर कामे झाली असून, त्यात आलेल्या 700 तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने नक्की चौकशी करावी”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज उस्मानाबाद येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “१ ते १४ ऑक्टोबर या काळात मोठा पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, कापणीला आलेली पिके आणि कापलेली पिके दोन्हींचे मोठे नुकसान झाले आहे.
आठ-आठ दिवस प्रशासन पोहोचले नाही, अशी अवस्था अनेक ठिकाणी आहे. जमीन मोठ्या प्रमाणात खरडली गेली आहे. त्यामुळे पुढचे पीक घेणे अशक्य आहे. आमच्या काळात यासाठी वेगळी मदत देण्यात आली होती.
केंद्र सरकारची प्रक्रिया सर्वांना ठावूक आहे. आधी राज्य सरकारचा प्रस्ताव सादर करावा लागेल. पंतप्रधान मोदीजी आधीच्या सरकारपेक्षा निश्चितपणे अधिक मदत करतील. तशी त्यांनी यापूर्वी सुद्धा महाराष्ट्राला केली आहे”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.