नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)—जगात आणि भारतात कोविड-19 विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये हा विषाणु किती दिवस राहू शकतो याबाबतही संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनातून बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. हे संशोधन भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे. कारण भारतात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या संशोधनविषयी आपण जाणून घेऊ या..
शरीरात किती दिवस राहू शकतो हा विषाणु?
कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात हा विषाणू किती काळ राहतो याचा अभ्यास अमेरिकेच्या अटलांटा येथील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने केला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, कोरोनाची लागण झालेल्या आणि गंभीर परिस्थितीतून गेलेल्या रुग्णामध्ये 90 दिवस हा विषाणु राहू शकतो म्हणजेच अशा रुग्णामध्ये संसर्गाचा धोका हा 90 दिवस राहू शकतो.
या व्यक्तींसाठी असतो १० दिवसांपर्यंत संक्रमणाचा धोका
या संशोधनानुसार, ज्या लोकांना कोरोना विषाणूचा गंभीर प्रादुर्भाव झालेला नाही अशा रुग्णांच्या शरीरात 10 दिवसांपर्यंत हा विषाणु राहू शकतो. म्हणजे अशा व्यक्तींना जवळजवळ 10 दिवस कोरोना विषाणूचा धोका असतो. या संशोधनात असाही दावा करण्यात आला आहे की ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा रुग्णांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका 20 दिवसापर्यंत राहतो.