पुणे(प्रतिनिधी )-राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र काम करत आहेत. मात्र, असे असले तरी पुणे महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. पुण्यात सध्या भाजपची सत्ता असली, तरी आता राज्यात निर्माण झालेल्या महायुतीच्या समीकरणांचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या उपमहापौरपदावर थेट दावा ठोकला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनियुक्त नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी गुरुवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची मागणी लावून धरली असून, या संदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय काकडे म्हणाले की, आम्ही राज्यात महायुतीचे प्रमुख घटक पक्ष आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळत पुण्याच्या उपमहापौरपदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा नैसर्गिक हक्क बनतो. पुण्याचे उपमहापौरपद राष्ट्रवादीला मिळावे, अशी आमची अधिकृत मागणी आहे. या विषयावर मी लवकरच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी तसेच खासदार पार्थ पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहे. त्यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून यावर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली जाईल, असेही काकडे यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. याविषयी काकडे यांना विचारले असता, त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. ते म्हणाले की, आमच्या पक्षात विलीनीकरणाबाबत तळागाळात कोणतीही चर्चा सुरू नाही. मला पक्षात प्रवेश करून अवघे ४० दिवस झाले आहेत, त्यामुळे पक्षाच्या अशा अत्यंत मोठ्या आणि धोरणात्मक निर्णयांवर बोलण्याचा मला अधिकार नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि स्वतः सुनेत्रा वहिनी यांना ४० ते ५० वर्षांचा दांडगा राजकीय अनुभव आहे. त्यामुळे पक्षाच्या हितासाठी काय निर्णय घ्यायचा, हे हेच ज्येष्ठ नेते ठरवतील. आमच्या पातळीवर सध्या तरी अशी कोणतीही चर्चा सुरू नाही.
आपल्या आगामी राजकीय प्रवासाबाबत बोलताना संजय काकडे यांनी पक्षाचे आभार मानले. माझ्या मुलाला पक्षाने उमेदवारी देऊन काम करण्याची एक मोठी संधी दिली आहे, असे सांगत ते म्हणाले की, आता येत्या काळात महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे किमान १० आमदार वाढवणे आणि आगामी निवडणुकांमध्ये खासदारांची संख्या वाढवणे हे मी माझे मुख्य कर्तव्य समजतो. येत्या ६ महिन्यांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून पक्ष संघटना तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही सर्व नेते एकत्रितपणे सर्व शक्तीनिशी काम करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.














