पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संपर्क; पुण्यातील ४५ संशयित एटीएसच्या ताब्यात


पुणे(प्रतिनिधी)-पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद संबंध असल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुण्यात मोठी धडक कारवाई केली आहे. मागील आठवड्यात नागपूरमध्ये केलेल्या कारवाईनंतर आता एटीएसने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात समांतर मोहीम राबवत तब्बल ४५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे पुणे परिसरातील सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथक गेल्या काही दिवसांपासून काही संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, सुमारे ६६ व्यक्ती सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या थेट संपर्कात होत्या. या माहितीच्या आधारे एटीएसने सापळा रचून ४५ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी केली जात आहे. देशविघातक कारवायांमध्ये या व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी एटीएसचे पथक सध्या संबंधित संशयितांच्या सोशल मीडिया अकाउंट्स, चॅटिंग, कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांचे बारकाईने विश्लेषण करत आहे.

अधिक वाचा  कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून 94 कोटी लुटणाऱ्या एकाला दुबईत बेड्या

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण अशा तिन्ही भागांत ही कारवाई करण्यात आली असून, संशयितांच्या घरांची आणि ठिकाणांची झडतीही घेण्यात येत आहे. या प्रकरणातील उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी एटीएसची पथके युद्धपातळीवर काम करत असून, येणाऱ्या काळात या प्रकरणात आणखीही काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित संवेदनशील मामला असल्याने, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी आणि त्यांचे गँगस्टरशी असलेले संबंध नेमके कशा स्वरूपाचे आहेत, यावर पोलीस यंत्रणेचा पूर्ण भर आहे. या मोठ्या कारवाईमुळे संशयास्पद जाळ्याचा पर्दाफाश होण्यास मदत होणार असून, एटीएसच्या या पावलामुळे देशविघातक प्रवृत्तींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love