मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना: ८ जणांचा मृत्यू, अनधिकृत बांधकामाचा धक्कादायक खुलासा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना
मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना

पुणे(प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला चार दिवस उलटूनही शनिवारी  संध्याकाळपर्यंत बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच होते. या ढिगाऱ्याखाली एकूण २३ जण अडकले होते, त्यापैकी १४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे, तर ८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी एक मृतदेह गुरुवारी शनिवारी दिवसभरात सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान,   अद्यापही एक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून त्याला  बाहेर काढण्याचे काम एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे.

या भीषण दुर्घटनेतून थोडक्यात बचावलेल्या कामगारांनी अंगावर शहारे आणणारे अनुभव कथन केले आहेत. कामगार रणवीर सिंग यांनी सांगितले की, दुपारच्या जेवणाच्या वेळी अचानक कचऱ्याचा मोठा ढीग सरकून इमारतीवर आला आणि काही क्षणात सर्वत्र अंधार झाला. मोबाईलच्या प्रकाशाच्या मदतीने त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल ९-१० तास मृत्यूशी झुंज दिली. विजय सपकाळ या कामगाराने सांगितले की, त्यांचा पाय ढिगाऱ्याखाली दबलेला असताना आणि मृत्यू समोर दिसत असताना त्यांनी आपल्या पत्नीला सेल्फी काढून मेसेज केला होता. स्वतः गंभीर जखमी असतानाही विजय यांनी आपल्या बाजूला अडकलेल्या दुसऱ्या कामगाराचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले, जे अत्यंत कौतुकास्पद ठरले आहे. सध्या घटनास्थळी ढिगारा उपसण्याचे काम सुरू असून बेपत्ता कामगारांच्या शोधासाठी यंत्रणा अहोरात्र काम करत आहेत.

अधिक वाचा  पुणे शहरात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराने धोका वाढला

नागरिकांमध्ये प्रचंड संताप

दुसरीकडे, प्रशासनाच्या संथ कारभारावर आणि अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. नातेवाईकांचा संयम आता सुटला असून त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालून प्रश्नांचा भडिमार केला. “इमारतीला भेगा पडल्याचे फोटो प्रशासनाला देऊनही वेळीच उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत?” असा संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. तसेच, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी आणि मंत्री केवळ भेटी देऊन आश्वासने देत आहेत, परंतु ठोस कृती होत नसल्याचा आरोपही पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

बचावकार्यादरम्यान मृतांची ओळख पटवण्यावरून घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. नातेवाईकांनी पोलिसांना घेराव घातला होता, कारण बाहेर काढण्यात आलेली व्यक्ती आपलीच नातेवाईक आहे का, हे पाहण्यासाठी त्यांची ओढाताण सुरू होती. अखेर गोंधळ टाळण्यासाठी प्रशासनाने मृतांची ओळख पटवण्याचे काम वायसीएम  रुग्णालयात हलवले असून, नातेवाईकांना तिथे जाऊन ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे.

अधिक वाचा  मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून प्रशासकीय इमारत गाडली गेली; १५ हून अधिक जण ढिगाऱ्याखाली, एनडीआरएफ आणि लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

मृतांच्या कुटुंबीयांना एकूण ४० लाख रुपयांची मदत

या दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये हा प्रकल्प चालवणाऱ्या अँटोनी वेस्ट ग्रुपने २५ लाख रुपये, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून १० लाख रुपये आणि राज्य सरकारकडून ५ लाख रुपयांच्या मदतीचा समावेश आहे. यासोबतच कुटुंबातील इच्छुक व्यक्तीला कंपनीत नोकरी आणि मृत व्यक्तीच्या मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च देखील कंपनी उचलणार आहे.

अनधिकृत बांधकामाचा धक्कादायक खुलासा

मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीत झालेल्या दुर्घटनेनंतर या वास्तूच्या अधिकृततेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. महापालिकेने या तीन मजली इमारतीपैकी केवळ तळमजल्यालाच बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला दिला असून, वरील दोन मजल्यांच्या बांधकामाला कोणतीही परवानगी नव्हती. ही अनधिकृत बांधकामे कोणाच्या संमतीने करण्यात आली आणि तेथे कँटीन व कॉन्फरन्स रूम कशी सुरू झाली, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, पर्यावरण विभागाने विनंती केल्यावर अवघ्या २४ तासांत बांधकाम विभागाने घाईघाईने प्रमाणपत्र दिल्याने प्रशासकीय पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा  सणसवाडी: मस्करीच्या नावाखाली 'हवेचा दाब' देऊन कामगाराचा बळी; कंपनीत खळबळ

कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही – सुनेत्रा पवार  

दरम्यान,  उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शनिवारी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची सविस्तर पाहणी केली आणि पीडित कुटुंबांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्ट केले की, ज्यांच्या निष्काळजीपणामुळे ही अतिशय वेदनादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे, त्या दोषींची कसून चौकशी केली जाईल आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. तसेच, शहरात पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी मोशीतील कचऱ्याचा हा मोठा ढिगारा लवकरात लवकर कमी करण्याचे आणि शहरात दुसरा एखादा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love