पुणे (प्रतिनिधी)- अवघाचा संसार सुखाचा करीन ! आनंदे भरीन तिन्ही लोक !!
जाईन गे माये तया पंढरपुरा ! भेटेन माहेर आपुलिया !!
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वरील अभंगवाणीचा प्रत्यय बुधवारी (८ जुलै २०२६) अलंकापुरीत आला. टाळ-मृदंगाचा निनाद, ‘माऊली-माऊली’चा अखंड जयघोष आणि रिमझिमणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५ व्या आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळ्याने पंढरीची वाट धरली. भक्ती, शक्ती आणि परंपरेचा हा त्रिवेणी संगम अनुभवण्यासाठी दीड लाखांहून अधिक वैष्णवांचा मेळा अलंकापुरीत दाखल झाला होता.
पहाटेपासून विधीवत धार्मिक कार्यक्रम या वैभवी सोहळ्याची सुरुवात पहाटे चार वाजता मंदिरात झालेल्या घंटानादाने झाली. त्यानंतर माऊलींच्या संजीवन समाधीला पवमान अभिषेक, पंचामृत पूजा आणि दुधआरती करण्यात आली. या विधीनंतर समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले, जिथे लाखो वारकऱ्यांनी माऊलींचे दर्शन घेऊन नतमस्तक झाले. दुपारी बाराच्या सुमारास माऊलींना महानैवेद्य अर्पण करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण मंदिर परिसर पाण्याने स्वच्छ करून प्रस्थान सोहळ्याची पूर्वतयारी करण्यात आली.
प्रस्थान सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम मुख्य प्रस्थान सोहळ्याला दुपारी अडीच वाजता सुरुवात झाली. सुरक्षेच्या आणि नियोजनाच्या कारणास्तव मानाच्या १ ते ४७ दिंड्यांमधील प्रत्येकी पन्नास वारकऱ्यांना मुख्य महाद्वारातून मंदिरात घेण्यास सुरुवात झाली. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास माऊलींच्या दोन्ही मानाच्या अश्वांनी मंदिरात प्रवेश केला, तेव्हा वारकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. सव्वापाच वाजता संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आणि हैबतबाबा यांच्या वतीने माऊलींची आरती करण्यात आली. त्यानंतर विना मंडपात मानकऱ्यांना नारळ-प्रसाद देऊन माऊलींच्या पवित्र पादुका अत्यंत सन्मानाने सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आल्या.
भक्तीचा जल्लोष आणि रिमझिम पाऊस
पालखीने मुख्य महाद्वारातून सायंकाळी सव्वासहा ते साडेसहाच्या दरम्यान प्रस्थान ठेवले. यावेळी आभाळ भरून आले होते आणि रिमझिम पाऊस पडत होता, मात्र या पावसाने वारकऱ्यांच्या उत्साहात अधिकच भर घातली. हातात भगव्या पताका घेतलेले पुरुष वारकरी आणि डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी विठूनामाच्या गजरात तल्लीन झाले होते. मंदिर परिसरात वारकऱ्यांनी टाळ-मृदंगाच्या तालावर फेर धरला आणि फुगड्या खेळल्या, ज्यामुळे संपूर्ण अलंकापुरी भक्तीरसात न्हाऊन निघाली होती.
प्रशासकीय तयारी आणि मुक्काम
या सोहळ्यासाठी अंदाजे २५० ते ३०० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. वारीच्या मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आळंदी ते पंढरपूर मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाने सर्व वारकऱ्यांना स्वच्छता राखण्याचे, शुद्ध पाणी पिण्याचे आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. महापुराच्या पार्श्वभूमीवर अनेक वारकरी थेट पुण्याकडे मार्गस्थ झाले.
उत्साही वातावरणात पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाली. पालखी मुक्कामासाठी आजोळी गांधीवाड्यात दाखल झाली. आज गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास पालखी सोहळा पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे.
पुरामुळे वारकऱ्यांची संख्या कमी पण, उत्साह तोच
इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे यंदा वारकऱ्यांची संख्या काहीशी कमी होती. वारकऱ्यांची संख्या कमी असली, तरी भक्तिभाव, नामस्मरण आणि वारीचा उत्साह नेहमीप्रमाणेच ओसांडून वाहत होता. प्रस्थान सोहळ्यासाठी मानाच्या दिंडीतील मोजक्याच वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला होता.
नदीकाठी पोलीस तैनात
इंद्रायणी नदीला महापूर आला आहे. आळंदीतील चारही पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. नदीकडे वारकऱ्यांनी जाऊ नये यासाठी पोलीस, जवान तैनात करण्यात आले होते. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
















