केतन अग्रवाल हत्या प्रकरण : सिया आणि प्रियकर चेतनचा ४ महिन्यांपूर्वीच झाला होता गुपचूप विवाह?

लोहगड किल्ला हत्या प्रकरण
लोहगड किल्ला हत्या प्रकरण

पुणे(प्रतिनिधी)-पुण्याच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित उद्योजक केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केला असल्याचा खळबळजनक दावा पोलिसांनी केला असून, त्यांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि लोकेशनच्या सखोल तपासातून हे धक्कादायक धागेदोरे हाती लागले आहेत. विशेष म्हणजे, १९ फेब्रुवारी रोजी सिया आणि केतन यांचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा झाला होता, मात्र हा कथित गुप्त विवाह साखरपुड्याच्या आधी झाला की नंतर, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी हा विवाह कुटुंबीयांपासून पूर्णपणे लपवून ठेवला होता, मात्र काही नातेवाईकांना याची कुणकुण असावी असा संशय पोलिसांना आहे. या दोघांना पुण्यात न राहता राजस्थानमधील उदयपूर किंवा जोधपूर येथे कायमचे स्थायिक व्हायचे होते. चेतन हा सियाला मारवाडी संस्कृती, तिथली पारंपरिक वेशभूषा आणि जीवनशैलीबद्दल माहिती देत होता, जेणेकरून लग्नानंतर ते तिथे नवीन आयुष्य सुरू करू शकतील. केतनसोबत नोव्हेंबर २०२६ मध्ये होणारे लग्न टाळण्यासाठी सियाने अनेक प्रयत्न केले होते. प्री-वेडिंग फोटोशूटसाठी बालीला जाणे असो वा वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरची ट्रीप, केतनसोबत एकाच खोलीत राहावे लागू नये यासाठी तिने हे सर्व कार्यक्रम टाळले होते, अगदी केतनचा पासपोर्टही तिने स्वतःकडे लपवून ठेवला होता.

अधिक वाचा  सोमवारपासून रंगणार 'ग्लोबल पुलोत्सव': रसिकांना मिळणार वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी : पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांना , तर पु.ल. स्मृती सन्मान ज्येष्ठ चित्र-नाट्य रंगकर्मी सई परांजपे यांना जाहीर

केतनची हत्या करण्यासाठी आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध कट रचला होता. कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी त्यांनी विविध वेब सीरिज, पॉडकास्ट आणि गाजलेल्या गुन्ह्यांच्या व्हिडिओंचा अभ्यास केला होता. शस्त्राचा वापर केल्यास पकडले जाण्याची भीती असल्याने त्यांनी हत्येला अपघाताचे स्वरूप देण्याचे ठरवले. हत्येचा पहिला प्रयत्न १४ जून रोजीच करण्यात आला होता, मात्र त्यावेळी सियाला प्रत्यक्ष कृती करण्याचे धाडस झाले नाही. तिने चेतनला मेसेज करून “माझे डेअरिंग होत नाही, तूही चल… आपण दोघे मिळून त्याला ढकलू,” असे म्हटल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. १४ जून रोजी तिने केतनला धक्का दिला होता, पण झाडाचा आधार मिळाल्याने तो वाचला, तेव्हा तिने सापापासून वाचवण्यासाठी धक्का दिल्याची बतावणी केली होती.

अधिक वाचा  लोणावळ्यात मुसळधार पावसाचा जोर; राजमाची किल्ल्याकडे जाणारा रस्ता दरडीमुळे बंद

शेवटी १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर प्री-वेडिंग फोटोशूटच्या बहाण्याने केतनला नेण्यात आले. यावेळी चेतन चौधरी हा चेहरा लपवण्यासाठी हुडी घालून त्यांच्या मागावर होता. केतन दरीकडे पाहत असताना या दोघांनी त्याला मागून धक्का देऊन संपवून टाकले. या प्रकरणाचा उलगडा करण्यात केतनच्या बहिणीने व्यक्त केलेला संशय आणि सियाच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. जानेवारी महिन्यापासून हत्येच्या दिवसापर्यंत सिया आणि चेतन यांच्यात तब्बल २००४ वेळा फोनवर बोलणे झाले होते, ज्याचा कालावधी ३३८ तासांहून अधिक होता. सध्या दोघेही पोलीस कोठडीत असून, फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर या प्रकरणातील आणखी काही गुपिते उघड होण्याची शक्यता आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love