पुण्यात रक्षकच बनले भक्षक: सहा पोलिसांविरुद्ध अपहरण आणि ५ लाखांच्या खंडणीचा गुन्हा दाखल; ‘स्मार्ट वॉच’मुळे फुटले पोलिसांचे बिंग


पुणे: पुणे-लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून, त्यांना अमली पदार्थांच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहा अज्ञात पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणवेशातील या गुन्हेगारांनी चार पर्यटकांचे अपहरण करून त्यांना तब्बल सात तास बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवले होते, मात्र एका तरुणाने आपल्या ‘स्मार्ट वॉच’चा कौशल्याने वापर करून मदतीचा संदेश पाठवल्याने या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश झाला. दरम्यान, आरोपी असणारे तीन कर्मचारी हायवे सुरक्षा पथकाचे पोलीस तर तीन जण होमगार्ड असल्याचे समजते.

या घटनेबाबत शुभजीत उमेश शर्मा (वय २८, रा. विमाननगर, पुणे) यांनी कामशेत टाकवे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी शुभजीत हे त्यांचे मित्र मोहम्मद काशान आझमी, त्यांच्या पत्नी आणि मेहुणे सय्यद जुबेर अहमद यांच्यासह टाटा पंच कारने (क्रमांक MH 12 WZ 1692) लोणावळ्याकडे फिरायला जात होते. रात्री ८:३० च्या सुमारास कामशेत परिसरात सहा अज्ञात पोलिसांनी त्यांची गाडी तपासणीच्या नावाखाली अडवली. गाडीची झडती घेत असताना त्यांना गाडीत ‘Amber Leaf’ कंपनीचे सिगारेटचे पाकीट सापडले. या पाकिटात गांजा असल्याचा खोटा आरोप करत पोलिसांनी पर्यटकांना पोलीस कारवाईची भीती घातली आणि ही कारवाई टाळण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली.

अधिक वाचा  पूजा खेडकरचा ठावठिकाणा लागेना? : खेडकर दाम्पत्याच्या घटस्फोटाबाबतचा अहवाल केंद्र सरकारला सादर

पोलिसांनी या सर्वांचे अपहरण करून त्यांना सात तास ताब्यात ठेवले आणि कोणाशीही संपर्क साधू दिला नाही. पैसे देण्यासाठी पर्यटकांना तळेगाव येथील एटीएमवर नेण्यात आले. दरम्यान, फिर्यादीच्या मित्राने आपल्या हातातील स्मार्ट वॉचचा वापर करून एका मित्राला आणीबाणीचा (SOS) संदेश पाठवला. या संदेशानंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि तीन पोलीस उपायुक्तांनी तातडीने सूत्रे हलवली आणि पर्यटकांची सुटका केली. सुरुवातीला हे कृत्य गुन्हेगारांचे असावे असे वाटले होते, परंतु तपासात हे अपहरणकर्ते चक्क गणवेशातील पोलीस असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२७(२), ३०८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश घनश्याम पवार करत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love