पुणे(प्रतिनिधी)- आई ही संकल्पना, शब्दच मनुष्याला निर्मळ विचारांकडे नेतो. माता यापेक्षाही आई या शब्दात ममत्त्व, त्याग आणि प्रेम जाणवते. आई हे नाव म्हणजे संस्कार आणि जिव्हाळ्याचे अतूट नाते आहे, असे प्रतिपादन शिखर बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी केले.
रंगत-संगत प्रतिष्ठान आयोजित आदर्श आई पुरस्काराने अरुणा केळकर यांचा आज (दि. ५) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. राजा दीक्षित, अरुणा केळकर यांचे पती ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर तसेच चिरंजीव, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर मंचावर होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. नवी पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्याधर अनास्कर पुढे म्हणाले, अरुणा केळकर यांनी आपल्या मुलांना प्रामाणिकपणा, करुणा, सेवा आणि मानवी मूल्यांची शिकवण आपल्या वर्तणुकीतूनच दिलेली असून खऱ्या अर्थाने आदर्श पाल्य घडविले आहेत. आईचे प्रेम हे नि:स्वार्थी असते परंतु ते जेव्हा सत्य, न्याय, नैतिकतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करते तेव्हा ते मातृत्व आदर्श राहत नाही. खरी आई आपल्या मुलांना शिक्षेपासून पळ काढायला नव्हे तर चुकांची जबाबदारी स्वीकारायला शिकविते.
सत्काराला उत्तर देताना अरुणा केळकर म्हणाल्या, हा पुरस्कार मला जाहीर झाला तेव्हा मला आईची अनेक रूपे डोळ्यासमोर आली. हा सन्मान माझ्या एकटीच्या मातृत्वाचा नसून सर्व मातांचा सन्मान आहे, अशी भावना मनात आहे. आमचे घर गोकुळासारखे असल्यामुळे मुलांवर संस्कार करताना घरातील प्रत्येकाचा त्यामध्ये सहभाग आहे. घरातील सर्व वडिलधाऱ्यांचा आमच्यावर आशीर्वादाचा हात असल्यामुळे मला आज हा पुरस्कार प्राप्त होत आहे.
डॉ. राजा दीक्षित म्हणाले, मानव आदिम अवस्थेपासूनच मातृपूजक आहे. मातृपूजा ही केवळ आजच्या माणसांमध्ये नाही तर मानववंशाच्या रक्तातच आढळते. त्यामुळे एखाद-दुसरा अपवाद वगळता मानव निसर्गत: मातृपूजकच आहे. प्रत्येक भाषेतील साहित्यात, कलाप्रकारात मातृगौरव केला गेला आहे.
डॉ. श्रीकांत केळकर, डॉ. आदित्य केळकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, मातृऋण फेडणे सोपे नाही; परंतु या पुरस्काराच्या माध्यमातून समाजाला नवी दृष्टी देण्याचा प्रयत्न आहे. सन्मान पत्राचे वाचन राजकुमार सुराणा यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त ‘आई’ या विषयावर आयोजित कविसंमेलनात म. भा. चव्हाण, प्रभा सोनवणे, अनिल दीक्षित, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, सुजित कदम यांचा सहभाग होता.














