राम मंदिर देणगी चोरी प्रकरण: ‘प्रत्येक रुपयाचा हिशोब सुरक्षित, संपूर्ण ट्रस्टला बदनाम करू नका’- कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी

स्वामी गोविंद देव गिरी राम मंदिर ट्रस्ट
स्वामी गोविंद देव गिरी राम मंदिर ट्रस्ट

नवी दिल्ली- अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या देणगीवर डल्ला मारल्याच्या प्रकरणावरून सध्या देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळातून ‘राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट’वर होत असलेल्या चिखलफेकीनंतर, ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी अखेर आपले मौन सोडले आहे. त्यांनी एका सविस्तर पत्राद्वारे या प्रकरणातील आपली भूमिका मांडताना स्पष्ट केले की, राम मंदिर ट्रस्टमध्ये जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचे पहिल्या दिवसापासून ऑडिट झाले आहे. सर्व आय-व्ययाचा हिशोब पूर्णपणे सुरक्षित असून, केवळ एका घटनेवरून संपूर्ण ट्रस्टला भ्रष्ट ठरवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत चुकीचे आणि दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

स्वामी गोविंद देव गिरी यांनी या प्रकरणाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. देणगी चोरीच्या या घटनेमुळे आपण अत्यंत आहत, दुखी आणि लज्जित असल्याचे त्यांनी मान्य केले. ही घटना ‘अविश्वसनीय’ असून यामुळे जगभरातील कोट्यवधी रामभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. मात्र, या एका दुर्दैवी घटनेचा आधार घेऊन ट्रस्टच्या प्रत्येक सदस्याला किंवा संतांना ‘चोर’ ठरवणे हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  मान्सूनचे पुनरागमन: २४ जूनपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज

या चोरीच्या प्रकरणामागील तांत्रिक बाजू स्पष्ट करताना गिरीजींनी कबुली दिली की, देणगी मोजण्याच्या प्रक्रियेत विहित नियमांचे (SOP) योग्य पालन न झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. पैसे मोजताना ज्या त्रुटी राहिल्या, त्याचा फायदा समाजकंटकांनी घेतला. मात्र, एकदा का हा पैसा ट्रस्टच्या बँक खात्यात जमा झाला, की तिथून तो गायब होणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे. कारण राम मंदिर ट्रस्टचे सर्व व्यवहार रोखीने किंवा चेकने न होता थेट बँक ट्रान्सफरद्वारे होतात, असे त्यांनी सांगितले. तसेच, आपल्याला कोषाध्यक्ष म्हणून नियुक्त केल्यापासून आपण कधीही देणगी मोजण्याच्या प्रक्रियेत सहभागी झालो नाही किंवा त्याशी आपला कोणताही संबंध राहिला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या पदाच्या निष्ठेबद्दल बोलताना गोविंद देव गिरी म्हणाले की, मी कोषाध्यक्ष पदासाठी कधीही कोणाकडे विनंती किंवा प्रयत्न केले नव्हते. प्रभू श्रीरामाची सेवा म्हणून ही जबाबदारी मी स्वीकारली आहे. मी दर दीड महिन्यांनी अयोध्येत येतो आणि माझ्या विमान प्रवासापासून ते वास्तव्यापर्यंतचा सर्व खर्च मी माझ्या वैयक्तिक खिशातून करतो; ट्रस्टचा एक रुपयाही मी कधीही यासाठी वापरला नाही. माझ्या पुण्याच्या कार्यालयातील चार्टर्ड अकाउंटंट दर महिन्याच्या अखेरीस अयोध्येत राहून सर्व हिशोबांची काटेकोर तपासणी करतात, जेणेकरून पारदर्शकता कायम राहील.

अधिक वाचा  "तुमच्या निष्क्रियतेमुळेच वैष्णवी गेली!" - कस्पटे कुटुंबीयांच्या भेटीदरम्यान रुपाली चाकणकर यांना महिलांचा घेराव

समाजवादी पक्ष आणि इतर विरोधी पक्षांनी लावलेले २,००० कोटी किंवा २०,००० कोटींच्या चोरीचे आरोप त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. हे आकडे निराधार असून ते कुठून आले, असा सवाल त्यांनी केला. जर कोणाकडे या चोरीचे ठोस पुरावे असतील, तर त्यांनी ते अफवा पसरवण्याऐवजी एसआयटी (SIT) समोर सादर करावेत, असे आवाहन त्यांनी केले. अफवा पसरवणे आणि पुरावे लपवणे हा देखील कायद्याने गुन्हा असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस आणि एसआयटी करत असून, ४५ दिवसांच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचीही सखोल तपासणी केली जात आहे. लवकरच ट्रस्टची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून, त्यामध्ये दोषींवर कठोर कारवाई करण्यासोबतच सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यावर आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी ‘फूलप्रूफ’ व्यवस्था करण्यावर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love