विडंबन काव्याला साहित्याचा दर्जा नाकारने चुकीचे – रामदास फुटाणे

पुणे-मुंबई
Spread the love

पुणेः- विडंबन काव्याला प्र.के.अत्रे आणि चिं.वि.जोशी यांच्या रुपाने  दीर्घ परंपरा आहे. विडंबन काव्याला साहित्याचा दर्जा नाकारला जातो. परंतू ते चुकीचे असून जीवन-मृत्यूच्या प्रवासात विनोदच आनंद पेरत असतो. त्यामुळे विनोदाला पर्याय नसल्याचे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि व्याख्याते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रतिवर्षी दिला जाणारा काव्य-गाैरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ हास्यकवी आणि विडंबनकार बंडा जोशी यांना रामदास फुटाणे यांच्या निवासस्थानी फुटाणे यांच्या हस्ते छोटेखानी समारंभात प्रदान करण्यात आला, त्यावेळी फुटाणे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलींद जोशी  उपस्थितीत होते. यावेळी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर, गाैरव रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, ग्रंथ,शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारचे स्वरुप आहे.

यावेळी बोलताना रामदास फुटाणे म्हणाले की, विनोदी आणि विडंबन काव्य निर्मीतीसाठी निरिक्षण शक्ती आणि सामाजिक अभ्यास देखील महत्त्वाचा असतो. विनोदी आणि विंडबन काव्यात सारांशरुपाने गहन अर्थ दडलेला असतो. विनोदी आणि विडंबन काव्य या साहित्य प्रकाराकडे गांभिर्याने पाहिले जात नाही, हे चित्र पालटले पाहिजे. व्यासपीठीय आणि विद्यापीठीय कविता असे सरसकट  शिक्के कवितेवर मारणे चुकीचे आहे. मंचावरुन सादर होणारी कविता आणि पुस्तकातील कविता दोन्ही श्रेष्ठ आहेत. माडगुळकर, खेबडुकर या उच्च दर्जाच्या कवींना देखील गीतकार म्हणून मान्यता मिळाली. परंतू कवी म्हणून मान्यता नाकरण्यात आली. या पंरपरेला छेद दिला गेला पाहिजे. काव्याचे अनेक प्रकार आहेत. कवींना ज्या स्वरुपात व्यक्त होणे सहज शक्य असते त्या स्वरुपात व्यक्त होऊ दिले पाहिजे. त्यांच्या व्यक्त होण्याच्या प्रक्रियेतून जी साहित्य निर्मिती होईल त्याचे मूल्यमापन काळाच्या कसोटीवर उतरते का आणि ते चांगले की वाईट हे ठरविण्याचा अधिकार वाचकांना सुपूर्त केला पाहिजे.

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, विडंबन म्हणजे विटंबना नव्हे, तो टीकेचा वाङमयीन प्रकार आहे. समाजातील विसंगती आणि दंभ यावर बोट ठेवणारी चांगली हास्य कविता केवळ रंजन करीत नाही तर ती डोळ्यात अंजन देखील घालते. हास्य कविता लिहिणा-या व्यक्तीकडे कवीची संवेदनशीलता आणि विनोदकाराची खेळकर वृत्ती असावी लागते. टाळ्या, सन्मान आणि पुरस्कार यांचा हव्यास हेच चांगल्या कवितेच्या प्रगतीतले मोठे अडसर आहेत. शेतकरी जसा चांगले पीक येण्यासाठी आपली जमीन काही काळ पडीक ठेवतो, तसेच कवींनी आपल्या निर्मितीची जमीन काही काळ पडीक ठेवली पाहिजे. भरपूर वाचन, मनन आणि चिंतन केले पाहिजे. कोरोनाच्या या संकटाने हतबल झालेल्या माणसांना आत्मचिंतन करायला भाग पाडले आहे. शब्दांनी देखील निःशब्द व्हावे असाच हा भयंकर काळ आहे.  भीतीचे आणि अंधाराचे सावट असलेल्या या काळात कवितेने समाजाला प्रकाश वाटा दाखवाव्यात आणि त्यासाठी आपण पराकोटीची संवेदनशीलता जपली पाहिजे. 

पुरस्काराला उत्तर देतांना विडंबनकार बंडा जोशी म्हणाले की, बालपणी माझा मामा श्रीपाद जोशी, तर कॉलेजमध्ये प्रा. पुरुषोत्तम शेठ व द.के.बर्वे यांच्यामुळे माझ्या साहित्य-कलागुणांची जडण-घडण झाली. नोकरीमध्ये किर्लोस्करवाडी आणि नंतर पुणे आकाशवाणीत आणि शहरात अनेक प्रतिभावंतांच्या सहवासात या गुणांचा विकास झाला. देशविदेशात माझ्या लेखन आणि कलेला रसिकांनी उदंड दाद दिली.यामधे माझ्या कुटुंबा इतकाच रंगत-संगत परिवाराचा सिंहाचा वाटा आहे.त्यामुळे माझ्यासाठी हे घरच्या माणसांनी केलेले कौतुक आहे. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी अनमोल आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.प्रमोद आडकर यांनी केले. गाैरव रामदास फुटाणे यांनी आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *