पुणे(प्रतिनिधी)— आपल्या भविष्यातील राजकीय भूमिकेबाबतचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आज (रविवार दिनांक २१ जून) दुपारी धाराशिव तालुक्यातील गोवर्धनवाडी येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून, त्यांच्याशी चर्चा करून आज संध्याकाळी अथवा उद्यापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळासह शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य राजकीय निर्णयाबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत. मात्र कोणताही निर्णय एकतर्फी न घेता प्रथम कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पुण्याहून धाराशिवकडे रवाना होताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “माझी ताकद ही कार्यकर्ते आहेत. त्यांच्या भावना आणि मत जाणून घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेणार आहे,” असे सांगितले.
प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते पराभूत का होतात?
सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलताना त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे तसेच ठाकरे कुटुंबाबद्दल आदर व्यक्त केला. मात्र त्याचवेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांना यश मिळत नसल्याबद्दल त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जनतेने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिल्यानंतरही स्थानिक पातळीवर पक्षाचे कार्यकर्ते पराभूत का होतात, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“माझ्या लोकसभा मतदारसंघात लोकांनी आम्हाला भरघोस मते दिली. विधानसभा निवडणुकांमध्येही पाठिंबा मिळाला. मात्र पंचायत समित्या, नगरपालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये आमच्या पक्षाच्या मशाल चिन्हावर लढणारा एकही निष्ठावान कार्यकर्ता निवडून येत नाही, याचे आत्मपरीक्षण होणे आवश्यक आहे. दिवसाचे चोवीस तास लोकांसाठी उपलब्ध असणारे, कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले आणि प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते पराभूत का होतात, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावरून त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेल्या वैयक्तिक टीकेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. काही माध्यमांमध्ये आपण कधीही न केलेली विधाने मुलाखतीच्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. अशा प्रकारच्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या बातम्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणाचा निकाल नुकताच लागला आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वी, ३ जून २००६ रोजी घडलेल्या या बहुचर्चित हत्याकांडाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. या प्रकरणात न्यायालयाने हत्येमागे राजकीय वैमनस्य आणि पूर्वनियोजित कट असल्याचे मान्य केले असले तरी, अपेक्षित स्वरूपाचा न्याय मिळाला नसल्याची भावना ओमराजे यांनी व्यक्त केली.
न्यायालयाच्या निकालाचा आदर करतानाच त्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “वीस वर्षांपासून माझ्या कुटुंबाने संघर्ष केला आहे. या काळात आम्ही न्यायाची अपेक्षा ठेवली. न्यायालयाचा निर्णय आम्ही स्वीकारतो; मात्र आमच्या भावना आणि अपेक्षा यांचा विचार करता आम्हाला अजूनही न्याय मिळालेला नाही, असे वाटते. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाचा उल्लेख करताना ओमराजे निंबाळकर भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवातच वडिलांच्या हत्येनंतर न्याय मिळवून देण्याच्या ध्येयातून झाल्याचे त्यांनी सांगितले. “एका व्यक्तीची हत्या करून त्याचा राजकीय प्रभाव संपवता येतो, हा समज चुकीचा आहे. माझ्या वडिलांची हत्या झाल्यानंतर लोकांच्या पाठबळावर मी राजकारणात आलो. समाजासाठी काम करत राहिलो आणि आजही त्याच विचाराने पुढे जात आहे,” असे ते म्हणाले.
















