माहितीचा अधिकार बोथट केल्यास ९० व्या वर्षीही मैदानात उतरणार; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

अण्णा हजारे माहितीचा अधिकार
अण्णा हजारे माहितीचा अधिकार

राळेगणसिद्धी: माहितीचा अधिकार हा सामान्य जनतेच्या हातातील सर्वात प्रभावी शस्त्र असून, त्याला बोथट करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. माहिती मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून, जर सरकारने यात केलेले बदल मागे घेतले नाहीत, तर वयाच्या ९० व्या वर्षीही जनतेच्या हितासाठी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसणार असल्याचा थेट इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर कडक शब्दांत टीका करताना म्हटले की, लोकशाहीमध्ये जनता ही ‘मालक’ आहे आणि शासकीय अधिकारी हे ‘सेवक’ आहेत. जर मालकालाच माहिती मिळवण्यासाठी त्रास दिला जात असेल किंवा अधिकार नाकारले जात असतील, तर ती लोकशाही नसून हुकूमशाही ठरेल. माहितीचा अधिकार हा लोकशाही वाचवण्यासाठी अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी आपण अनेक वर्षे लढा दिला आहे.

अधिक वाचा  #Pune Public Policy Festival : शैक्षणिक पदवीपेक्षा धोरणांचा समाजाला आणि देशाला होणारा उपयोग समजून घेणे जास्त महत्त्वाचे

शुल्क वाढीवरून सरकारवर ओढले ताशेरे

माहितीच्या अधिकारासाठी अर्जाचे शुल्क १० रुपयांवरून वाढवून ३० रुपये करण्याच्या सरकारच्या निर्णयावर अण्णांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “सरकार म्हणजे पैसे कमवण्याचे साधन नाही, तर त्यांनी जनतेचे हित पाहिले पाहिजे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला सुनावले आहे. शुल्कात वाढ करून शासन सामान्यांची अडवणूक करत असून, माहिती द्यायची की नाही आणि ती किती दिवसात द्यायची, याचे सर्व अधिकार आता अपिलीय अधिकाऱ्यांऐवजी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही बाब लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनतेच्या हितासाठी पुन्हा उपोषणाची तयारी

अण्णांनी आपल्या आजवरच्या प्रवासाचा उल्लेख करत सांगितले की, माहितीचा अधिकार, दप्तर दिरंगाई कायदा, आणि बदल्यांचा कायदा यांसारखे १० महत्त्वपूर्ण कायदे आपण उपोषणाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी करून घेतले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी तीन वर्षांच्या आत बदली न करण्याचा कायदाही आपणच रेटून धरला होता.

अधिक वाचा  #Supriya Sule Vs Sunetra Pawar : बारामती लोकसभेसाठी नणंद- भावजय येणार आमणे सामने?

“माझ्या बँक खात्यात पैसे नाहीत, ना माझ्याकडे कोणते मोठे संघटन आहे; केवळ समाजसेवा हेच माझे जीवन आहे,” असे सांगताना अण्णा भावूक झाले. त्यांनी स्पष्ट केले की, आपण जगलो तर समाजासाठी आणि मरू तर देशासाठी, हेच आपले व्रत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून विचारणा केली जाईल आणि जर सरकारने आपल्या भूमिकेत बदल केला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. ९० वर्षांचे वय झाले तरीही अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपण मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार अण्णा हजारेंनी व्यक्त केला आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love