Pune Municipal Corporation Election : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शहराचे राजकीय वातावरण सध्या कमालीचे तापले असून, यंदा अत्यंत चुरशीची आणि बहुरंगी लढत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांमधील युती आणि आघाड्या केवळ कागदावरच उरल्याचे चित्र सध्या स्पष्ट दिसत असून, जागावाटपावरून निर्माण झालेला पेच अखेरच्या क्षणापर्यंत सुटलेला नाही. विशेषतः महायुती आणि दोन्ही राष्ट्रवादी या दोन्ही मोठ्या आघाड्यांमध्ये बिघाडी झाल्याने पुण्याचे राजकीय मैदान आता पूर्णपणे विखुरले गेले आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील समझोता केवळ औपचारिक? दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील समझोता केवळ औपचारिक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला केवळ ४० जागा देण्याचा दावा केला होता आणि स्वतः १२५ जागा लढवणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ७० पेक्षा जास्त उमेदवारांना ‘एबी’ फॉर्म वाटले आहेत. या परस्परविरोधी दाव्यांमुळे अनेक प्रभागांमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.
भाजप-सेना युती तुटली? दुसरीकडे, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना यांच्यातील युतीबाबतही शेवटच्या क्षणापर्यंत मोठा पेच निर्माण झाला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने पुण्यातील सर्व १६५ जागांवर ‘एबी’ फॉर्म वाटल्याने ते स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) किंवा विजय शिवतरे (Vijay Shivtare) यांच्यासारखे नेते उमेदवारांना माघार घ्यायला लावण्याचे संकेत देत असले, तरी राजकीय निरीक्षकांच्या मते एकदा अधिकृत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवार सहजासहजी माघार घेत नाहीत.
या सर्व घडामोडींमुळे पुण्यात कोणतीही एक भक्कम युती शिल्लक राहिलेली नाही. भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावत आहे, तर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आपापले स्वतंत्र उमेदवार उभे करत आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना देखील स्वबळावर मैदानात उतरली असून, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना आणि त्यांनी सोबत घेतलेली वंचित बहुजन आघाडी यांची स्वतंत्र फळी सक्रिय आहे. अशा प्रकारे, पुण्यात प्रत्येक प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने ही निवडणूक खऱ्या अर्थाने “बहुरंगी” झाली आहे.















