पुणे(प्रतिनिधि) –मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, राज्यभर गाजलेल्या या प्रकरणाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. आज(शुक्रवार) त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
सुरुवातीला वैष्णवी शशांक हगवणे (वय २४) हिने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने हे प्रकरण खुनाकडे वळले. वैष्णवीच्या आई-वडिलांनी तिचा हुंड्यासाठी छळ करून हत्या केल्याचा गंभीर आरोप केला होता.
वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्नात ५१ तोळे सोने, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देऊनही लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच पती शशांक, सासू लता आणि सासरे राजेंद्र यांनी किरकोळ कारणांवरून भांडणे सुरू केली. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता. पती, सासू, सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून गैरवर्तन केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. वैष्णवीने १६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेतल्याचे सांगण्यात आले होते.
या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे आणि नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना अटक केली होती. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार झाले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पथके वाढवण्याचे आदेश दिले होते. गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याच्या एकूण आठ टीम त्यांच्या मागावर होत्या. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे स्वतः या प्रकरणी लक्ष ठेवून होते. आरोपी प्रत्येक वेळी आपले ठिकाण बदलत असल्याने त्यांना पकडणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले होते.
अखेर, शुक्रवारी पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बावधन पोलिसांनी अटक केली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे अटक होण्याअगोद तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.
दरम्यान, या घटनेत पहिल्याच दिवशी राज्य महिला आयोगाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे की, कायदा आणि प्रशासन आपले काम करत असून, गुन्हा नोंद आहे आणि आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करत आहे.
या प्रकरणाशी संबंधित आणखी एका घडामोडीत, २० मे रोजी वैष्णवीच्या ९ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी तिच्या माहेरकडील मंडळी कर्वे नगर येथील निलेश चव्हाण याच्या घरी गेली होती. निलेश चव्हाण याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बाळाचा ताबा देण्यास नकार दिला आणि दहशत निर्माण केली. निलेश चव्हाण हा वैष्णवीचा नवरा शशांक आणि नणंद करिश्मा यांचा मित्र असल्याचे सांगितले जाते. वैष्णवीचे काका मनोज कस्पटे यांनी बाळाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याची तक्रार वारजे पोलिसांत दिली होती, मात्र पोलिसांनी निलेश चव्हाण विरोधात धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. नंतर एका फोन कॉलद्वारे वैष्णवीचे बाळ कस्पटे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले.