नवी दिल्ली(ऑनलाइन टीम)— भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर सोशल मिडियातून हल्ले करणाऱ्या व्यक्तिबद्दल एका व्यक्तीने ट्वीट करून माहिती दिल्यानंतर स्वामी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. स्वामी यांनी या व्यक्तीच्या ट्वीटला उत्तर देताना ,”हाच तो दाऊदचा उजवा हात आणि शरद पवार यांचा चेला आहे, ज्याला त्यांनी माझ्या २जी प्रकरणानंतर नाकारले,” असे ट्वीट केले आहे. मात्र, सुब्रमण्यम स्वामींचा नक्की रोख कोणाकडे आहे याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
भाजपा नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी हे नेहेमी आपल्या विविध वक्तव्यावरून तसेच विविध विषयांवरील भूमिका जाहीरपणे मांडण्यासाठी सर्वांना परिचित आहेत. भूमिका मांडताना विरोधकांबरोबरच स्वपक्षातील त्यांना न पटणाऱ्या गोष्टींबद्दलही ते जाहीररित्या बोलतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी स्वपक्षाच्या आयटी सेल विरुद्ध बंड पुकारले असून पक्षाच्या आयटी सेलच्या अमित मालवीय यांच्यावर कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. पक्षाच्या अध्यक्षांनाही याबाबत त्यांनी अल्टीमेटम दिला आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्वपूर्ण मानले जात आहे. त्यांचा रोख नक्की कोणाकडे आहे याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शरद पवार यांच्यावर यापूर्वीही स्वामी यांनी निशाणा साधला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर शरद पवार यांनी त्याला जाहीररीत्या सुनावले होते. त्यावेळी स्वामी यांनी ट्वीट करून पवार यांच्यावर निशाण साधला होता. “राष्ट्रवादी काँग्रेस अतंर्गत कलहामुळे संकटात आहे. कारण शरद पवार आणि अजित पवार यांची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. निरज गुंडे यांनी सुप्रिया सुळे यांच्या सिंगापूरचे नागरिकत्व व कंपन्यांच्या मुद्दा उचलून धरला आहे. संचालकांनी सीबीआयच्या चांगल्या अधिकाऱ्यांची टीम निवडली आहे. फॉरेन्सिक चौकशीही डॉ. सुधीर गुप्ता यांच्याकडे आहे,” असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं.