पुणे(प्रतिनिधि)— उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मेहनत घेतली. पण उद्धव ठाकरे यांचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक झाल्याने त्याचं आत्मपरीक्षणही उद्धव ठाकरे यांनी करावं, असा सल्ला भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरामध्ये पत्रकारांशी लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरे यांनी घेतली. त्यांची ही मेहनत पाहून एक मित्र या नात्याने मनात भीती वाटायची. प्रत्येकाला काही ना काही आजारपण असतात. तसं त्यांचंही आहे. तरीही त्यांनी मेहनत घेतली. ते खूप फिरले. पण त्यांना ९ खासदार मिळाले, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना आत्मपरीक्षणाचा सल्लाही दिला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, २०१९ ला युती पुढे राहिली असती, तर ज्यांना घरीच बसायचं होतं त्यांच्या १३ आणि ८ जागा आज आल्या नसत्या. उद्धव ठाकरे यांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मी सल्ला देणारा नाही. पण उद्धव ठाकरेंनी काय मिळवलं? हाताशी काय लागलं? अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका त्यांच्यावर बसला. मनसेच्या एका नेत्याने हा भगवा विजय नाही, हिरवा विजय आहे असं म्हटलं. हे समर्पक आहे. हे एका बाजूने झालं.
दुसऱ्या बाजूने उद्धव ठाकरे यांच्या जागा १८ वरून ९ वर आल्या. २०१९ ला सोबत राहिले असते तर वाताहत झाली नसती. या सर्वात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने बक्कळ फायदा करून घेतला. याचं विश्लेषण उद्धव ठाकरेंनी केलं पाहिजे. लोकसभेच्या धड्याहून अनेक गोष्टी नीट करता येतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
ग्लास अर्धा भरलेला आहे आणि…
स्टॅटीस्टिक काही गोष्टी सांगतात. लोकसभा निवडणुकीत फटका बसत असताना पहिल्यांदा ओडिशात सरकार आलं. पूर्ण बहुमताचं सरकार आलं. अरुणाचलमध्येही सरकार आलं. सहयोगी पक्षाचं पाच वर्षाच्या गॅपमध्ये आंध्रात सरकार आलं. देशात एकूण तीन सरकार आले. अरुणाचल प्रदेश छोटं राज्य आहे. पण बाकीचे मोठे राज्य आहेत. भाजपला एकट्याला २४१ जागा मिळाल्या आहेत. या सर्वांना मिळून २३१ जागा मिळाल्यात. ग्लास अर्धा भरलेला आहे आणि ग्लास अर्धा रिकामा आहे, असं दोन्ही म्हटलं जातं, असं सूचक विधानही त्यांनी केलं.