पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील आरोपी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात गाडी चालवून दोघांचा जीव घेतला. त्यानंतर त्याला १५ तासात जामीन मिळाल्यानंतर संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी चुकीचा तपास केला, आर्थिक व्यवहार झाले, राजकीय दबाव टाकण्यात आला असे आरोप केले गेले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी कडक कारवाईचे आदेश दिले होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजकीय दबावाला बळी पडू नका, कोणालाही पाठीशी घालू नका अशा सूचना पुणे पोलिसांना केल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी धडक कारवाई करत बांधकाम व्यावसायिक आणि अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालसह सात जणांना अटक केली आहे. त्यामध्ये ड्रायव्हर चत्रभूज डोळस आणि दुसरा व्यक्ति राकेश पौडवाल यालाही अटक केली आहे. तसेच अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांना देखील अटक करण्यात आली आहे.
बार चालक आणि कर्मचारी यांची २४ मे पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी
विशाल अग्रवाल याला मंगळवारी संध्याकाळी पुणे पोलिस आयुक्तालयात आणण्यात आले. त्याला आज (बुधवार) न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नमन भुतडा, जयेश बोनकर व विशाल अगरवाल यांच्यावर मोटारवाहन अधिनियम १९८८ चे कलम ३,५, १९९ (ए )व अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण कायदा २०१५) कलम ७७, ७५ नुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नमन प्रल्हाद भुतडा (वय -२५), सचिन काटकर(३५), संदीप सांगळे(३५) यांना न्यायालयात हजर केले. यावेळी सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायलयाने आरोपीस २४ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.याप्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ॲड. विद्या विभुते आणि ॲड. योगेश कदम यांनी युक्तिवादात केली. आरोपींच्या वतीने ॲड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली. अपघात आणि मद्य विक्री प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत. दोन गुन्हे वेगळे आहेत. त्यामुळे आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती ॲड. जैन यांनी युक्तिवादात केली. सामाजिक कार्यकर्ते सारंग यादवाडकर यांनी ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत बाजू मांडली. भरधाव वेगामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. कल्याणीनगर अपघात गंभीर गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले.
न्यायालयाने सुनावले
कल्याणीनगर अपघात गंभीर गुन्हा आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला. मुलाला मद्य विक्री प्रकरणी हॉटेलमालकासह व्यवस्थापाकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटना वेगळ्या आहेत, स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. मुळात हे प्रकरण गंभीर आहे. अपघातात दोघांचे बळी गेले आहेत. पब, हॉटेलमध्ये खातरजमा न करता मुलांना मद्य विक्री करण्यात असल्याचे उघडकीस आले आहे. पब, हॉटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या गोंधळाच्या तक्रारी आल्या आहेत. मद्य पिऊन भरधाव वेगाने वाहन चालविल्याने निष्पांपाचे बळी गेले, अशा शब्दात अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावले.
विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून पोलिसांच्या ताब्यात
विशाल अग्रवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख आहेत. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहित असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हे नॉट रीचेबल झाले होते अखेर त्यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधून एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी संध्याकाळी पोलिस आयुक्तालयात आणून तांत्रिकदृष्ट्या अटक केली. आज (बुधवार) अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
जनतेच्या रोषामुळे टीकेची प्रचंड झोड उठल्यानंतर राज्याच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारीच पुणे अपघातप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. तसेच कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत फडणवीसांनी दिले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला. याप्रकरणात कुणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा : वडेट्टीवार
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांच्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पुणे अपघातातील आरोपीची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. अल्पवयीन असलेला आरोपी दारूत पित असल्याचे सीसीटीव्ही फुटेज असूनही हा अहवाल आल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्न चिन्ह विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे पुणे अपघात प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.