पुणे – पुणे जिल्ह्यातील माहविकास आघाडीच्या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थ पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेला काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच काँग्रेसमधील दोन स्थानिक नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते आहे.
पुणे लोकसभा निवडणुकीसाठी माहाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर हे निवडणूक लढवत आहेत तर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ हे रिंगणात उतरले आहेत. धंगेकरांची उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून शहर काँग्रेस पक्षांतर्गत वादाला तोंड फुटले आहे. एकतर धंगेकर यांच्या उमेदवारीला काहींचा विरोध होता. त्यामध्यें काँग्रेसचे नेते आबा बागुल हे अग्रस्थानी होते. त्यांनी बंड पुकारत आंदोलनही केले. त्यानंतर फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी समजूत काढल्यानंतर आबा बागुल यांनी त्यांची बंडाची तलवार म्यान केली.
एकीकडे हे घडतअसताना मतदानाची तारीख जवळ आलेली असतानाही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील हेवेदावे मात्र, अजूनही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे धंगेकरांच्या प्रचारात एकसंधपणा दिसत नसून धंगेकर ‘सोशल मीडिया’वर महायुतीवर टीका करताना दिसत असले तरी. काँग्रेसच्याच अंतर्गत धुसफुसीने त्यांना ग्रासले आहे.रा
हुल गांधींची सभा असल्याने त्यांच्याबरोबर व्यासपीठावर स्थानिक नेत्यांपैकी कोण कोण बसणार यावरून शहराचा पदाधिकारी आणि राज्य पातळीवरील पदाधिकाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक उडाल्याची माहिती आहे. व्यासपीठावर राहुल गांधींबरोबर बसणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही पोलिसांचे सुरक्षा पास आवश्यक आहे. ते घेताना त्यासाठी कोणाची नावे द्यायची यावरून या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमोरच शाब्दिक चकमक झाली. शेवटी अधिकाऱ्यांनीच लवकर काय ते सांगा असे म्हटल्यानंतर वादाची मिटवामिटवी करण्यात आली. मात्र, जे सुरक्षा पास सकाळी मिळणार होते ते अगदी सभेच्या एक तास अगोदर देण्यात आले.