पुणे(प्रतिनिधि)–सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला कसली मर्दुमकी दाखवता, मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, अश्या कडक शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाहीर सभेत आव्हान दिलं.
शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे जेष्ठ नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हे यांना पांडुनच दाखवतो. असं म्हटल्यानंतर आजच्या जाहीर सभेत डॉ.कोल्हेंनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला. अजित दादा जेव्हा तुम्ही माझ्या सारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला पाडून दाखवतो असे म्हणता. तेव्हा माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडला की मी काय चूक केली? शेतकऱ्यांचे, बिबट्यांचे, जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली? की स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली?
तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा ना मर्दुमकी. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला, बिबट्याच्या त्रासापासून मुक्त करायला मर्दुमकी दाखवा. मात्र, पाडापाडी करण्याची भाषा आणि दमदाटी करणं सोडा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, हे ही ठणकावून सांगितलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी काल पुण्यात आले होते. या सभेत मोदी यायच्या आधी अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव यांना फक्त साडे तीन मिनिटं देण्यात आली. यात ही त्यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात, यावर भाष्य केलं. शेतकरी धोरणाचे विरोधी उमेदवार कौतुक करतात. मात्र शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणार भाव, दुधाचे दर, कांदा निर्यात, टोमॅटो याबद्दल ते बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही कांदा निर्यात बद्दल बोलले नाहीत. दहा वर्षात ते पुण्यात अनेकदा आले, मात्र एकदा ही शिवजन्मभूमी आले नाहीत. त्यांना इथं येऊन नतमस्तक व्हावंसं वाटलं नाही अशी टीका त्यांनी केली.
होय, आमचे साहेब आमचा आत्मा आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सभेत शरद पवारांना भटकती आत्मा म्हणत टीका केली. त्यावर बोलताना कोल्हे म्हणाले, हो, आमचे साहेब आत्मा आहेत. ते जनतेचा आत्मा आहेत. वाजपेयींच्या सत्ताकाळात भूकंप ग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हाचं आत्मा पुढं आला होता., अस सांगत मोदींनी केलेल्या टिकेला उत्तर दिलं. हा आत्मा शेतकऱ्यांच्या बांधावर, तरुणांना न्याय देण्यासाठी भटकतो. याला आम्ही पवित्र मानतो. आम्ही आमच्या आत्म्याला जपतो आणि कायम जपणार आहोत. आमचा आत्मा पक्ष, घरं फोडत नाही.
संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत कोणाच्या कंपनीच भल केलं?
आपल्या भाषणात डॉ. कोल्हे यांनी, काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत ६०-७० प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीच भल होतंय हे कळतय. अस म्हणत त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोला लगावला. अमोल कोल्हे लढायला तयार नव्हता, मग अचानक कसा तयार झाला. असं अजित दादा सर्वत्र म्हणतात. मात्र दादा ही विचारांची लढाई आहे, स्वाभिमानाची लढाई आहे. म्हणून ताठ मानेने जगायचं अन लढायचं ठरवलं असंही कोल्हे म्हणाले.