मुंबई : सोनी सब वाहिनीवरील वंशज ही मालिका प्रेक्षकांना रोलर कोस्टर राईडचा अनुभव देते. एका धनाढ्य कुटुंबाच्या व्यवसायातील हेवे दावे आणि सत्ता संघर्ष यांचे चित्रण या मालिकेत केले आहे. ..सतत काही ना काही लक्षणीय घडत असते, आणि प्रेक्षक देखील ‘आता या आठवड्यात काय घडणार’ या प्रतीक्षेत असतात .आपले वडील प्रेमराज (अक्षय आनंद) यांच्या हत्येमागील रहस्य शोधण्याचा ध्यास घेतलेल्या युविकाच्या (अंजली तत्रारी) मार्गात अनेक आव्हाने उभी असलेली दिसत आहेत. सोनी सबवरील मॅडम सर मालिकेत SHO हसीना मलिकची भूमिका करणारी सगळ्यांची लाडकी गुल्की जोशी युविकाच्या न्यायाच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका करून लोकप्रिय होत आहे. हसीना ही युविकाची मार्गदर्शक, विश्वासू आणि निष्ठावान सोबती झाली आहे. त्यांच्यातील अतूट नाते आणि हसीनाची मदत यामुळे प्रेक्षकमालिकेत अधिक गुंतत जातील आणि सत्य शोधण्याच्या थरारक प्रवासात युविकाचे भावनिक सोबती बनतील.
गुल्की जोशीने मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याचा हा अंश –
- वंशज सारख्या वारसा हक्काच्या पारंपरिक मताला आव्हान देणाऱ्या मालिकेत काम करताना कसे वाटते आहे?या मालिकेच्या विषयाबाबत तुझे काय मत आहे?*
सोनी सबने टेलिव्हिजनच्या पारंपरिक साच्याला शह देणारी मालिका लोकांपुढे आणली आहे आणि ती वेधक असल्याने लोकांनाही ती आवडली आहे. टीव्हीवर कथा कशी मांडली जावी याविषयीच्या कल्पना या मालिकेने पार बदलून टाकल्या आहेत. त्यांचे प्रयत्न नक्कीच फळले आहेत, कारण मी जेव्हा मालिकेचे एपिसोड बघितले, तेव्हा ते फारच वेधक होते. व्यक्तिरेखांमधली नाती आणि संघर्ष खूपच सुंदर पद्धतीने दाखवला आहे. मला अशा मालिका आवडतात, ज्यामध्ये सशक्त आणि स्वतंत्र स्त्री व्यक्तिरेखा असतात आणि त्या दृष्टीने ‘वंशज’ने लक्षणीय कामगिरी केली आहे.
- ‘वंशज’मधील तू साकारलेली हसीना मलिक ही व्यक्तिरेखा युविकाला खरा गुन्हेगार शोधण्यात कशी मदत करेल, याविषयी आम्हाला सांग.*
युविकाची सहयोगी आणि सत्याच्या शोधातील तिची मार्गदर्शक म्हणून हसीना महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. खोटेपणा आणि फसवेगिरीच्या मागचा मुख्य सूत्रधार आणि प्रेमराजच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण आहे याबाबत युविका आणि तिचे संपूर्ण कुटुंब अनभिज्ञ आहे. खरा गुन्हेगार शोधून काढण्यासाठी माझी व्यक्तिरेखा युविकासाठी मार्गदर्शक बळ म्हणून काम करेल आणि शेवटी ती हे रहस्य शोधून काढेल.
- या मालिकेत हसीना आणि युविका यांच्यातील नात्याविषयी आम्हाला सांग आणि कथानकाच्या ओघात हे नाते कसे दृढ होत जाते त्याविषयी देखील सांग.*
या मालिकेतील हसीना आणि युविका यांचे नाते विलक्षण आहे. महाभारतातील कृष्णार्जुनाच्या नात्यासारखे हे नाते आहे. सुरुवातीला हसीना ही संकट समयी युविकाची तारणहार बनून येते, जेव्हा युविका गंभीररित्या जखमी झालेली असते. कथानक पुढे सरकते तसे, त्या दोघींच्यातील नाते अधिक विश्वासाचे आणि दृढ होत जाते. एरवी लोकांच्या बाबतीत साशंक असणाऱ्या युविकाला हसीना आपल्या मोठ्या बहिणीसारखी वाटते.
- न्याय मिळवण्यात महत्त्वपूर्ण असलेल्या हसीनासारख्या भूमिकेसाठी तू तयारी कशी केलीस? तिच्या व्यक्तिरेखेत असे काही पैलू आहेत का, जे तुला रोचक वाटतात किंवा अभिव्यक्त करताना आव्हानात्मक वाटतात?*
सुरुवातीला मला तयारी करण्याची गरज वाटली, कारण मी ही भूमिका केली होती, त्याला काही लोटला होता. पण, मी जेव्हा हसीना मलिकचा गणवेश चढवला, तेव्हा आपसूक मी त्या भूमिकेत शिरले. ‘वंशज’साठी शूटिंग करताना नव्या वातावरणात रुळण्यास मला जेमतेम एक दिवस लागला, कारण या मालिकेच्या कलाकारांनी मला लगेच आपलेसे केले. मी त्यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहे, असे मला जाणवलेच नाही. हसीनाची एक खासियत आहे की ती मध्येच काही मोठमोठी, नाट्यात्मक वाक्ये बोलते. ते थोडे आव्हानात्मक असते. परंतु, मी रंगमंचावर काम केले असल्याने मोठी वाक्ये लक्षात ठेवण्याची आणि मोठी दृश्ये करण्याची मला सवय आहे. त्यामुळे असे संवाद पाठ करून त्यावर अभिनय करणे मला तसे सोपे गेले.
- हसीना हे मॅडम सर या मालिकेतील एक लोकप्रिय पात्र आहे. वंशज मालिकेत त्याच रूपात तू आलीस, यावर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया होती?*
प्रेक्षकांचा प्रतिसाद भारावून टाकणारा होता. माझ्या सोशल मीडियावर तर शुभ संदेशांचा जणू पूर आला आहे. मला कल्पना नव्हती की प्रेक्षक माझ्या पुनरागमनाची इतक्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. मला या रूपात आणण्यामागे लोकांची मागणी हा एक मोठा घटक होताच. परत येऊन मला देखील खूप छान वाटते आहे. सार्थक वाटते आहे. अर्थात मला माझ्या ‘मॅडम सर’च्या टीमची खूप आठवण येते, पण अंजली फार मस्त सहकलाकार आहे. ती गोड मुलगी आणि अप्रतिम अभिनेत्री आहे. प्रेक्षकांकडून मिळत असलेले प्रेम मन सुखावणारे आहे. मला आशा आहे की, ही कथा पुढे सरकत जाईल तसे त्यांना माझी व्यक्तिरेखा आणि वंशज ही मालिका अधिकाधिक आवडत जाईल.