स्लॅबला लागणारी लोखंडी जाळी अंगावर कोसळून ६ कामगारांचा मृत्यू


पुणे- येरवड्यातील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगला गेट नंबर ८ मध्ये ब्ल्यू ग्रास बिझनेस पार्कच्या बांधकाम साईटवर लोखंडी सांगाडा बांधण्याचे काम सुरू असताना तो अचानक कोसळल्याने ६ जणांचा मृत्यू झाला तर १० कामगार जखमी झाले आहेत. ही दुर्घटना गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.  जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ब्ल्यू ग्रास बिझनेस पार्क कंपनीसह अहलुवालिया कन्स्ट्रक्शन यांच्यावर सदोष मनुष्यवधासह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, येरवड्यातील शास्त्रीनगरच्या वाडिया बंगला गेट नंबर ८ येथील एका नवीन इमारतीसाठी तळमजल्यावर लोखंडी सांगाडा बांधणीचे काम सुरू होते. गुरुवारी रात्री साडेअकरा  वाजता हा सांगाडा अचानकपणे कोसळला. त्या सांगाड्या खाली काही कामगार काम करत होते. सांगाडा कोसळल्याने सर्व कामगार त्या खाली दबले गेले.

अधिक वाचा  महसूल खात्यातील बड्या आयएएस अधिकाऱ्याला ८ लाखांची लाच स्वीकारताना रांगेहाथ पकडले : सीबीआयची कारवाई

त्यामुळे तेथे एकच गोंधळ उडाला. तात्काळ अग्निशामक दलाला ही माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या ६ गाड्या, १०८ च्या रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले. हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की, त्या खाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर केला. तो सांगाडा कापून कामगारांना बाहेर काढण्यात आले. यात ६ जणांचा मृत्यू झाला १०  कामगारांना  ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, स्थानिकांनी संबंधीतावर गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.

फारुक वाडिया यांची ही जमीन असून अहलुवालिया यांची साईट असल्याची माहिती समोर आली आहे.एवढ्या रात्री या साईटवर काम कसं काय चालू होतं ? या मॉलच्या बांधकाम वेळेस सुरक्षतेची योग्य ती जबाबदारी घेतली आहे का ? एवढ्या रात्री देखील काम सुरू करायला कुणी परवानगी दिली ? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.

अधिक वाचा  जम्बो कोविड सेंटरमधील कामकाजामध्ये होते आहे सुधारणा? काय केले बदल?

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. पुण्यातील एका बांधकामग्रस्त इमारतीत झालेल्या दुर्घटनेने अतीव दुःख झाले. शोकाकुल कुटुंबियांचे मी सांत्वन करतो. मला आशा आहे की या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व जण लवकरात लवकर बरे होतील : पंतप्रधान नरेंद्र मोदी असे ट्वीट त्यांनी केले आहे.

मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर

पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ बांधकाम सुरु असलेल्या इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून उपमुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love