पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कल्याणीनगर येथे झालेल्या ‘हीट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचे ‘ब्लड सॅम्पल’ कचऱ्याच्या पेटीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणी ससून रुग्णालयाचे फॉरेन्सिक लॅब प्रमुख अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक केली आहे. तर ‘ब्लड सॅम्पल’मध्ये फेरफार करण्यासाठी वडगाव शेरीतून ३ लाख रुपये स्विफ्ट कारमधून घेऊन येणाऱ्या ससूनमधील शव विच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळे यालाही अटक केली आहे. या तिघांना न्यायालयाने ३० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याच्या सांगण्यावरुन डॉक्टरांनी आरोपीच्या ब्लडमध्ये फेरफार केल्याची माहिती उघड झाली आहे. डॉक्टरांनी आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकलं आणि दुसऱ्याच व्यक्तीचं ब्लड सॅम्पल घेत पोलिसांना पाठवलं. हेच ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं कोर्टात सादर करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार झाल्याचं उघड झालं.
ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये टाकण्यासाठी वडगाव शेरीतून आले ३ लाख
दरम्यान, ब्लड सॅम्पल कचऱ्यामध्ये टाकण्यासाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टरांमध्ये पैशांचे दिवाण-घेवाण सुद्धा झाली होती. त्यासाठी वडगाव शेरीतून ३ लाख रुपये स्विफ्ट कारमधून घेऊन येणाऱ्या ससूनमधील शिपायाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. अतुल घटकांबळे असं त्याचं नाव असून तो ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन विभागामध्ये शिपाई म्हणून काम करतो. त्यामुळे पैशांच्या बदल्यांमध्ये ससूनच्या दोन वरिष्ठ डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल थेट कचऱ्यामध्ये टाकून दिल्याचे स्पष्ट झालं आहे.
तिघांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी
डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरनोळ आणि अतुल घटकांबळे या तीनही आरोपींना न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी पोलीस आणि आरोपींच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. “ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल चेंज करण्यात आले आहे. आरोपी डॉ. अजय तावरे याच्या सांगण्यावरून डॉ. हरनोळ याने ते ब्लड सॅम्पल बदलले. आरोपी अतुल घटकांबळे याने पैशांची मध्यस्थी केलेली आहे. याच प्रकरणात विशाल अग्रवाल जे अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत त्यांचाही आम्हाला ताबा हवा आहे. या सर्व आरोपींची समोरासमोर चौकशी करायची आहे. या सर्व प्रकरणात आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. हरनोळ हे ससूनमध्ये सिएमओ म्हणून काम करतात. अजय तावरे हे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत. आरोपी अतुल घटकांबळे पोस्टमॉर्टम डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. आम्हाला मोबाइल जप्त करायचे आहेत. तसेच जे पैशांचे व्यवहार झाले आहेत तेही आम्हाला हस्तगत करायचे आहेत”, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.
“आम्हाला ससूनमध्ये अल्पवयीन आरोपीच्या मेडिकलवेळी कोण कोण रुग्णालयात उपस्थित होते त्याचीही माहिती घ्यायची आहे. आणखी कोणाच्या सांगण्यावरून ब्लड सँपल बदलले तेही तपासायचे आहेत. आम्हाला यासाठी जास्तीत जास्त पोलीस कोठडी हवी आहे. आरोपींची १० दिवस पोलीस कोठडी हवी आहे”, असा युक्तिवाद पोलिसांनी केला.
ससून रुग्णालयातल्या ललित पाटील केसचा संदर्भ तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिला. ससूनमध्ये ललित पाटील प्रकरणात काही डॉक्टरांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे या हिट अँड रन प्रकरणात आम्हाला सखोल तपास करायचा असल्याचे तपास अधिकारी यांनी न्यायालयाला सांगितले.
आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद
“आरोपींवर लावण्यात आलेली काही कलम जामीनपत्र आहेत. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी देण्यात येऊ नये. आम्ही रात्रीपासून त्यांच्या ताब्यात आहोत. आमचे मोबाईल त्यांच्याकडे आहेत. डीव्हीआरही त्ंयानी ताब्यात घेतलेला आहे. फक्त रिकव्हरीसाठी आमची पोलीस कोठडी देण्यात येऊ नये”, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. वकील ऋषिकेश गानू आणि वकील विपुल दुषी यांनी आरोपींच्या बाजूने युक्तिवाद केला. सेशन कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तीनही आरोपींना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.