देशभरात उभारणार १ हजार क्रीडा निपुणता केंद्रे – किरेन रिजिजू


पुणे- येत्या २०२८ पर्यंत ऑलिंपिकमध्ये पदके जिंकणा-या देशांच्या यादीत भारत हा पहिल्या दहामध्ये असावा हे माझे स्वप्न आहे. हे साकार करायचे असल्यास स्थानिक पातळीपासून खेळाडूंची निवड करीत त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. देशात सुमारे ७०० जिल्हे असून काही जिल्ह्यात एक तर काहींमध्ये २ अशा प्रकारे संपूर्ण देशात सुमारे १००० खेलो इंडिया निपुणता केंद्रे उभारण्याची आमची योजना असल्याचे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी केले.

केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- बालेवडी येथे उभारण्यात आलेल्या खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचा लोकार्पण सोहळा आज पार पडला, त्या वेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विभागीय संचालिका सुश्मिता जोत्सी, खासदार गिरीश बापट, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी केंद्रासाठीच्या तांत्रिक सुविधां संदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालय व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) सोबत एक सामंजस्य करार देखील आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. २०२१ मध्ये टोकियो येथे होणा-या ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाजी प्रकारात पात्र ठरलेल्या तेजस्वीनी सावंत, राही सरनोबत, स्वरूप उन्हाळकर व बॅडमिंटनमध्ये १९ वर्षांखालील गटात जगातील दुस-या क्रमांकाचा खेळाडू वरुण कपूर यांचा सत्कार या वेळी रिजिजू यांच्या हस्ते करण्यात आला.

अधिक वाचा  प्रदक्षिणा मार्गावर उद्या रंगणार शिवनेरी मॅरेथॉनचा थरार : ११०० धावपटू सहभागी होणार

या वेळी बोलताना रिजिजू म्हणाले, “भारतासारख्या देशात क्षमता असून देखील त्याचे संधीमध्ये रूपांतर करण्यात आपण कमी पडतो. हेच लक्षात घेत अगदी स्थानिक पातळीवर खेळाडूंच्या क्षमता ओळखत त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन स्पर्धेसाठी तयार करण्याच्या उद्देशाने देशभरात खेलो इंडिया निपुणता केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. ही केंद्रे स्थानिक, राज्य व राष्ट्रीय पातळीवर काम करतील व याद्वारे खेळाडूंच्या सर्वांगिण विकासावर भर देण्यात येईल. इतकेच नाही तर खेळाडूंबरोबर नागरिकांचा खेळाकडे पहायचा दृष्टीकोन बदलून देशात खेळाची संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.”

ते पुढे म्हणाले की, “केवळ महाराष्ट्र नाही तर देशाच्या क्रीडा विश्वात पुण्याचे एक वेगळे स्थान आहे. राज्यभरात स्थापन होत असलेल्या या राज्य निपुणता केंद्रांपैकी तीन केंद्रे ही महाराष्ट्रात तर त्यातील १ केंद्र हे पुण्यात आहे, त्यामुळे पुणे आणि महाराष्ट्र राज्य या दोघांकडून देशाला खूप अपेक्षा आहेत. आज आपल्या देशाची क्रीडा संस्कृती वाढविण्याबरोबरच ती जपण्याची जबाबदारी आपल्याला उचलावी लागेल. हे करीत असताना प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असेल याची शाश्वती बाळगा.”

अधिक वाचा  आयपीएल 2020 मध्येही होणार 'व्हर्च्युअल कॉमेंट्री’चा प्रयोग?

अनेकदा उतारवयात किंवा खेळातून बाहेर पडलेल्या खेळाडूंना आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशा वेळी सरकार या खेळाडूंच्या पाठीशी उभे राहील याची ग्वाही रिजिजू यांनी या वेळी दिली. क्रीडा संस्कृती वाढण्यासाठी सरकार बरोबर सामान्य नागरिकांनीही प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी क्रिकेटप्रमाणे इतर खेळांची ‘व्हयूअरशिप’ हा महत्त्वाचा मुद्दा असल्याचे रिजिजू या वेळी म्हणाले. क्रिकेटप्रमाणेच आपल्या पारंपरिक खेळांना देखील महत्त्व द्या, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. प्रसिद्ध खेळाडूंच्या नावे खेळासाठी वापरण्यात असलेल्या इमारतींच्या नामकरण उपक्रमाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहितीही यावेळी रिजिजू यांनी दिली.    

पुण्यात स्थापन होणा-या केंद्राची माहिती देताना ओमप्रकाश बकोरिया म्हणाले, “पुण्यात आज सुरू झालेल्या या राज्य निपुणता केंद्रात नेमबाजी, सायकलिंग व अॅथलिट या क्रीडाप्रकारातील प्रत्येकी ३० याप्रमाणे एकूण ९० खेळाडूंना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यादरम्यान खेळाडूंचे प्रशिक्षण, निवास व भोजन व्यवस्था यांचा समावेश असणार आहे. सदर संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत ही ३८.२ कोटी रुपये इतकी असून खेळाडूंच्या निवडीचे काम सध्या सुरू आहे.”

अधिक वाचा  आई.. कुस्ती जिंकली पण मी हरले.. माफ कर मला : भारताची कुस्तीगीर विनेश फोगाट हिचा कुस्तीला अलविदा

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राला आजवर शूटिंग रेंजसाठी ३. ७० कोटी रुपये, स्पोर्ट्स सायन्स सेंटरसाठी १.३० कोटी रुपये तर इतर आवर्ती खर्चासाठी २.७५ कोटी रुपये केंद्र सरकारने उपलब्ध करून दिले असल्याची माहितीही बकोरिया यांनी दिली.    

खेलो इंडिया उपक्रमासाठी आवश्यक सोयीसुविधांची उभारणी, अॅथलिट ट्रॅकची कामे, शूटिंग रेंजचे अपग्रेडेशन, स्पोर्ट्स सायन्स सेंटरची उभारणी आदी बाबींसाठी आम्ही आणखी सरकारी निधीच्या प्रतीक्षेत असून, तो मिळावा यासाठी आम्हाला मदत करावी अशी विनंती देखील बकोरिया यांनी रिजिजू यांना केली. क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे उप संचालक सुधीर मोरे यांनी आभार मानले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love