पुणे- पंजाबमध्ये गहू आणि तांदळाचे जास्त उत्पादन होते. केंद्रीय कृषिमंत्री असताना पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांना संधी मिळेल, त्या-त्या वेळी अधिक प्रमाणात गहू व तांदूळ पिक घेतल्याचे परिणाम मार्केटिंगवर जसे होतात तसेच मातीच्या प्रतवारीवर देखील त्याचे दुष्परिणाम होतात हे मी सांगितले. गहू आणि तांदळाचे क्षेत्र कमी करू त्याठिकाणी डाळी व फळबागा लागवडी वाढवण्यासाठी आवाहन देखील तेथील शेतकऱ्यांना केले होते, मात्र त्याबाबत फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सांगितले.
बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये दि.18 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत “कृषिक” या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषि तंत्रज्ञान सप्ताहास आज ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मंत्री महोदयांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक त्रिलोचन मोहपात्रा(ऑनलाईन), राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, उपसंचालक सुरेश चौधरी, ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र पवार व सुनंदा पवार, बायर कंपनीचे डॉ. सुभाष जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व सॉलिडारिडार, आशिया या संस्थांमध्ये करण्यात आलेल्या कराराच्या (एमओयु) प्रतीचे हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या 50 वर्षातील वाटचालीविषयी बनविण्यात आलेल्या चित्रफितीचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
पवार म्हणाले, सध्या देशपातळीवर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामागचे एक प्रमुख कारण म्हणजे पंजाब, हरियाणा येथे पिकणाऱ्या गहू व तांदूळ या पिका संदर्भातील किंमती आहेत. तसेच योग्य बाजारपेठ मिळत नसल्यामुळे हा संघर्ष निर्माण झाला आहे. गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळपिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवे. शेतीसाठी ‘पाणी’ हा घटक महत्वाचा आहे. शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशाप्रकारे पाण्याचा वापर करायचा याची माहिती शेतकऱ्यांना होणे आवश्यक असते.
आज आपल्याकडे मोठ्या प्रमाणात तांदूळ व गव्हाचे पीक घेतले जाते. त्यामुळे विषमते सारख्या समस्या निर्माण होतात. एकत्रित विचारविनिमय करून ग्राहकाला परवडेल आणि शेतकऱ्यांना चार पैसे कसे मिळतील. यासाठी देशभरात त्या-त्या जिल्हा विभागात कोणत्या प्रकारची पिके घेता येतील, याचा विचार होणे गरजेचे असल्याचे शरद पवार म्हणाले.