कॅप्टन दीपक साठे आईच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अचानक नागपूरला पोहोचून आईला देणार होते ‘सरप्राईज’
नागपूर(ऑनलाईन टीम)–केरळमधील कोझिकोड विमानतळावर झालेल्या अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानमधील अन्य १७ जणांसह कॅप्टन दीपक साठे यांनीही प्राण गमावले. आज (शनिवार दि. ८ ऑगस्ट) त्यांच्या आईचा ८४ वा वाढदिवस होता. आईच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अचानक नागपूरला पोहोचून कॅप्टन दीपक साठे आपल्या आईला ‘सरप्राईज’ देणार होते. परंतु, आईचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच शुक्रवारी ५८ वर्षीय साठे यांच्यावर काळाने घाला घातला. साठे यांच्या नातेवाईकांनी ही माहिती दिली.
त्यांचे पुतणे डॉ. यशोधन साठे यांनी सांगितले की आज (शनिवार) कॅप्टन साठे यांच्या आईचा वाढदिवस आहे. कॅप्टन साठे यांची व त्यांच्या आईवडिलांची मार्चमध्ये अखेरची भेट घेतली होती. परंतु, फोनच्या माध्यमातून ते त्यांच्याशी नियमित संपर्कात होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे आई-वडिलांशी फोनवरून बोलणे झाले होते. डॉ. साठे यांनी सांगितले की कॅप्टन साठे यांनी आपल्या काही नातेवाईकांना सांगितले होते की जर विमान उपलब्ध झाले तर ते आईच्या वाढदिवशी नागपूरला येऊन आईला सरप्राईज देतील.
वायुसेनेचे आठही पुरस्कार प्राप्त करणारा तो पहिला महाराष्ट्रीयन
कॅप्टन साठे हे पत्नीसमवेत मुंबईत राहत होते. त्यांची आई निला साठे या पती, सेवानिवृत्त कर्नल वसंत साठे यांच्यासह नागपूर येथील भरत कॉलनी येथे राहतात. कॅप्टन साठे यांनी आईला कोरोना विषाणूच्या साथीमुळे घर सोडू नको असे सांगितले होते. आपले दु:खाश्रू आवरत नीला साठे म्हणाल्या, “कोरोना विषाणूमुळे मला घराबाहेर पडू नये, असे तो सांगायचा. तो म्हणायचा की मला काही झाले तर सर्वात जास्त दु:ख त्याला होईल आणि अचानक हा अपघात झाला. देवाच्या इच्छेसमोर आपण काय करू शकतो?
नीला साठे यांनी आठवणींना उजाळा देत सांगितले की, खेळ असो वा अभ्यास सर्व गोष्टीमध्ये तो अव्वल होता. टेबल टेनिस व स्क्वॅशमध्ये त्यांनी प्रभुत्व मिळवले होते आणि तो चांगला घोडेस्वारही होता. माझ्या मुलाला दुर्मिळ ‘स्वार्ड ऑफ ऑर्नर’ मिळाला होता परंतु तो कधीही आपल्या यशाबद्दल चर्चा करत नव्हता. वायुसेनेचे आठही पुरस्कार प्राप्त करणारा तो पहिला महाराष्ट्रीयन होता असे सांगून त्या म्हणाल्या, “तो लोकांना मदत करायचा आणि इतरांना मदत करण्यासाठी काहीही करायचा.
गुजरात पूर आला होता तेव्हा त्याने सैनिकांच्या मुलांच्या खांद्यावर घेऊन त्यांना वाचवले होते. तो एक अतिशय आश्वासक अधिकारी होता. साठे यांच्या आईने आपला मोठा मुलगा विकास साठे याचीही आठवण सांगितली, जो सैन्यात लेफ्टनंट होता आणि एक रोड अपघातात मरण पावला होता.