पुणे– चांगली मैत्रीण असलेल्या तरुणीकडे तरुणाने लग्नासाठी तगादा लावला. मात्र, हे तरुणीला न आवडल्याने त्या तरुणीने नकार देऊन भेटणे कमी केले. याचा राग मनात धरून या तरुणाने चक्क ही तरुणी काम करीत असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन पिस्तूलचा धाक दाखवून तिचे अपहरण केले. मात्र, चिंचवड पोलिसांनी सहा तासाच्या आत आरोपीला बेड्या ठोकून तरुणीची सुखरूप सुटका केली आहे. ही घटना काल सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याद्वारे पोलिसांनी आरोपीचा छडा लावला. शंतनू चिंचवडे (वय २५) असे बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण झालेली तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या ऑफिसमध्ये काम करत होती, तेव्हा आरोपी शंतनू ऑफिसमध्ये आला आणि पिस्तूलचा धाक दाखवून त्याने तरुणीचे अपहरण केले. दरम्यान, ऑफिसमधील कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी तरुणीच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. तरुणीच्या वडिलांनी तात्काळ चिंचवड पोलिसात जाऊन घटनेची माहिती दिली. चिंचवड पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीचा शोध लावत तळेगाव दाभाडे येथून आरोपीला अटक केली.