पुणे(प्रतिनिधी)— राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, होय मी एकदा नाही दोनदा लस घेतली आहे परंतु,मी कोरोना वरची लस घेतली असं लोक म्हणतात पण ते खरं नाही तर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे बीसीजी इंजेक्शन घेतलं आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टीटयूट येथे राज्यातील साखर उद्योगाच्या प्रश्नावर बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मी कोरोनाची कोणतीही लस टोचून घेतलेली नाही. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे बीसीजी इंजेक्शन घेतलं आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेही रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचं इंजेक्शन घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र ही कोरोनाची लस नाही, तर रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीचे इंजेक्शन घेतलं असल्याचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटला दिलेली ही दुसरी भेट आहे. 1 ऑगस्टला देखील शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटमध्ये जाऊन कोरोनावरील लस बनवण्याच काम कसं सुरु आहे याची माहिती घेतली होती. मात्र शरद पवारांच्या या भेटींमुळे त्यांनी कोरोनाची लस घेतल्याच्या अफवा पसरत आहेत. कोरोनाची लस घेतल्यामुळे बिनधास्त राज्यभर दौरे करत आहेत, अशा अफवा पसरल्या होत्या. यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्युटकडून तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची माहिती घेतली. मी सीरम इन्स्टिट्युटमध्ये जातो कारण पुनावाला माझे मित्र आहेत. तसेच लसीची प्रगती कुठपर्यंत पोहचलीय हे समजून घेण्यासाठी मी तिथं गेलो होतो, असं त्यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेबाबत बोलतांना ते म्हणाले की, मला उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेबाबत फारशी माहिती नाही. पण पोलिसांचे वक्तव्य मी ऐकले. पण त्या मुलीची हत्या झाली आणि तिच्या कुटुंबाच्या इच्छेव्यतिरिक्त तिच्यावर अंत्यसंस्कार झाले हे तर खरं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलेली भुमिका ही टोकाची आहे, घृणास्पद आहे आणि तितकीच निंदणीय आहे मुलीच्या अंत्यसंस्काराला नातेवाईकांना उपास्थित राहू दिलं नाही अशी घटना देशात कधी घडली नाही. उत्तर प्रदेश सरकारने कायदा हातात घेतला ,टोकाची भूमिका घेतली कायद्याला कवडीची किंमत दिली नाही अशी टीका करून ते म्हणाले, राहुल गांधी यांना जाऊ द्यायला पाहिजे होतं भेटू द्यायला पाहिजे होतं. राहुल गांधी भेटायला जात असताना त्यांच्यावर जी कारवाई झालीय यावरून कायद्याचे राज्य आहे यावर तुमचा विश्वास नाही अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सरकार न्यायालयात गेलं आहे आणखी कुणी जात असेल तर ..
मराठा आरक्षणाबाबत बोलताना, सर्वोच्च नायालायातील स्थगिती उठवणे गरजेचे असूनघटना पीठाकडे सुनावणी जावी यासाठी सरकार आग्रही आहे. सरकार न्यायालयात गेलं आहे. आणखी कुणी जात असेल तर जावं 10 जणांनी जावं असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी पार्थ पवार यांचे नाव न घेता लगावला. सरकार असो वा राष्ट्रवादी स्थगिती उठवावी हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजातील तरुणांची अस्वस्थता कमी व्हावी यासाठी आग्रही , प्रयत्नशील आहोत मात्र, आत्महत्या करणं योग्य नाही असेही ते म्हणाले.
बाबरी प्रकरण:निकाल आश्चर्य जनक
बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी न्यायालयाने जो निर्णय दिला तो आश्चर्यजनक आहे असे सांगत कल्याण सिंग यांनी आश्वासन पाळलं नाही असे पवार म्हणाले. माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांची अस्वस्थता योग्य असून आता वाराणसी, मथुरा चर्चा सुरू झाली आहे. देशाचं सामाजिक ऐक्य कसं टिकणार ही चिंता असल्याचे त्यांनी नमूद केलं.
राज्यात काही घडेल यासाठी चंद्रकांत पाटील यांनी साडेचार वर्षे वाट पहावी
मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सातत्याने राज्य सरकारवरवर टीका करतात त्याबाबत बोलताना पावर म्हणाले, राज्याच्या विधानसभेत फडणवीस विधानसभेने आरक्षण संदर्भात ठराव पास केलं, नंतर सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. त्यांना विस्मरण झालेलं दिसत. त्यांना खूप कळतं परंतु मलाही थोडफार कळतं असा टोला त्यांनी लगावला. राज्यात अनपेक्षित काहीही घडू शकतं या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर बोलताना पवार म्हणाले, माझ्या त्यांना शुभेच्छा आहे असं काही घडेल यावर त्यांनी साडेचार वर्ष काढावी असा चिमटा त्यांनी काढला.