साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये- शरद पवार

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

उदगीर(भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर नगरी) – लोकाश्रयापेक्षा राजाश्रयाच्या हत्तीवरील अंबारीत जर आम्ही साहित्य शारदेला बसवू लागलो तर ‘अमृतातेहि पैजा जिंके’ असे बोल तिच्या वीणेतून कसे उमटतील? असा लेखक आणि विचारवंत विद्याधर गोखले यांच्या वाक्याचा संदर्भ देत साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये, (writers should control politicians but rulers should not have remote control of writers) असे मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले.

उदगीर येथे भरलेल्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले, माझी  साहित्यरसिकांना विनंती आहे की आपल्या सहकार्याशिवाय साहित्यरथ धावणार नाही. साहित्यरथाची लोकाश्रय आणि राजाश्रय हे दोन चाके आहेत असे मी मानतो. प्राचिन इतिहासात डोकावले की लक्षात येते की, विक्रमादित्य, हर्षवर्धन , यशोवर्मन आदी राजांच्या पदरी अनुक्रमे कालिदास ,बाणभट्ट ,भवभूती अशी श्रेष्ठ रत्ने होती. छत्रपती शिवरायांच्या दरबारी कवी भूषण, संभाजीराजांच्या पदरी मित्र कवी कलश अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. अगदी मुस्लीम राज्यकर्त्यांनी देखील भारतीय कलाकारांना दरबारी आश्रय दिला. अल्लाऊद्दीन खिल्जी, सम्राट अकबर ही त्यातील काही उदाहरणे आहेत. पण राजाश्रय असलेल्या कवी-लेखकांना व्यवस्थेला आव्हान करणारे लिखाण करण्यावर मर्यादा येत. साहित्यिक अंगाने त्यांचे साहित्य उच्चकोटीतील  आहे ह्यात शंका नाही परंतू समाजव्यवस्था बदलण्या इतकी धार त्यांच्या लेखणीत नसे. त्यांची लेखणी सार्वभौम व स्वायत्त नव्हती. लेखक-विचारवंत श्री. विद्याधर गोखले यांनी म्हटले आहे की लोकाश्रयापेक्षा राजाश्रयाच्या हत्तीवरील अंबारीत जर आम्ही साहित्य शारदेला बसवू लागलो तर ‘अमृतातेहि पैजा जिंके’  असे बोल तिच्या वीणेतून कसे उमटतील? थोडक्यात साहित्यिकांच्या हाती राजकर्त्यांवर अंकूश हवा पण राज्यकर्त्यांच्या हाती साहित्यिकांचा रिमोट कन्ट्रोल असू नये.

साहित्याची ताकद खऱ्या अर्थाने फ्रेंच राज्यक्रांतीवेळी दिसून आली.  फ्रेंच राज्यक्रांतीने मुळे जगाला समजले की,लेखणी ही क्रांतीची मशाल होऊ शकते. रूसो, व्हॉल्टेअर यांच्या तत्वज्ञानाने क्रांतीचा परिपोष केला, सामान्यांनी वर्गव्यवस्था लाथाडली  आणि सोळाव्या लुईची जुलमी राजवट उलथवली. यावरून एक बोध घेता येतो की, हस्तिदंती मनोऱ्यातील साहित्यात सामर्थ्य नसते तर ते समाजाभिमूख असले तरच त्यात शक्ती येते.

मराठी साहित्याबाबतीत बोलायचे झाले तर दूसऱ्या बाजीरावाच्या काळात साहित्याला अवकळा आली. त्यानंतर ब्रिटीश राज्यकर्त्यांनी नोकर निर्माण करण्यासाठी शिक्षणाला मोकळीक दिली परंतू साहित्यावर अनेक बंधने लादली. विष्णूशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, स्वातंत्र्यवीर सावरकरकृत मॅझिनीचे चरित्र, खाडीलकरांची भाऊबंदकी व किचकवध नाटके यांवर ब्रिटिशांनी बंदी आणली. त्यामुळे१८७८ साली न्या.रानडे आणि लोकहितवादी यांनी संमेलन भरवण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल तसे क्रांतीकारक होते. कारण संमेलनाच्या दोन महिन्यापूर्वी ब्रिटीश राज्यकर्त्यांनी देशी वृत्तपत्र स्वांतत्र्याची गळचेपी करणारा व्हर्न्याक्यूलर प्रेस कायदा पास केला होता. त्याला ह्या दोहोंनी एकप्रकारे आव्हानच दिले होते असे त्यांनी सांगितले. .

साहित्यिकांमध्ये आणि राज्यकर्त्यांमध्ये परस्पर समन्वयाचे आणि स्नेहभावाचे नाते असावे असे मला वाटते. प्रस्तुत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. भारत सासणे हे लोकशाहीच्या कार्यकारी मंडळ ह्या लोकशाहीच्या स्तंभात एक सनदी अधिकारी होते. त्यामुळे शासन आणि साहित्यिक यांमधील समन्वय आणि स्नेहभाव वृद्धींगत होत राहील याचे आशादायी मला दिसते. मी देखील अनेक वर्षे लोकशाहीच्या पहिल्या स्तंभाचे प्रतिनिधित्व करतो आहे. माझा देखील साहित्यिकांशी स्नेहभाव कायम राहिला.  ‘साहित्य म्हणजे प्रेम, जे माणसांना जोडते !’  इतकी सोपी व्याख्या मधु मंगेश कर्णिकांनी   केली आहे. मला ती खूप भावते. साहित्यिकांकडून मला खूप मोलाच्या सूचना मिळतात. मी त्यांकडे गांभिर्याने पाहतो, असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *