पुणे- ३५व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये यंदा महिलांचा नारदीय कीर्तन महोत्सव रविवार दि. २४ सप्टेंबर रोजी सायं. ५.०० ते ८.०० या वेळेत श्री हरीकीर्तनोत्तेजक सभेचे व्यास सभागृह, टेलीफोन एक्स्चेंज समोर, बाजीराव रस्ता येथे संपन्न होईल. पुणे फेस्टिव्हल मधील कीर्तन महोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष आहे असे या महोत्सवाच्या संयोजिका कीर्तन विशारद ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या कि, यावेळी “वंदे विनायकम्” हा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये नमनाचे श्लोक, सामुहिक नारदीय नमन, जयोस्तुते श्री महन मंगले हा अभंग आणि त्यावर आधारित पूर्वरंग सादर होणार आहे. त्याला अनुसरून उत्तररंगात महिलांची चक्री आख्याने, झाशीची राणी, महाराणा प्रताप आणि वी.दा. सावरकर या राष्ट्रीय क्रांतीकारकांची चरित्रात्मक आख्याने व ३ बाल आख्याने असे विषय सादर होतील.
यात अनुक्रमे बालकीर्तनकार लोपामुद्रा सिंग, कौमुदी मराठे, अनुश्री ब्रम्हे, युवती कीर्तनकार तन्मयी मेहेंदळे, ह.भ.प. अर्चना कुलकर्णी, ह.भ.प. निर्मला जगताप आणि संयोजिका कीर्तन विशारद ह.भ.प. निवेदिता मेहेंदळे हे कीर्तनकार सहभागी होणार आहेत. यावेळी गौरी पवार (तबला), प्रांजली पाध्ये (हार्मोनियम), संध्या साठे (झांज व टाळ) आणि सहगायन माधवी राजे करतील.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हरीकीर्तनोतेजक सभेच्या उपाध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. नंदिनी पाटील भूषवतील. यावेळी ज्येष्ठ सतार वादक उस्ताद उस्मान खाँ, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत आणि वारकरी कीर्तनकार उल्हास पवार व प्रसिद्ध गायक दयानंद घोटकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. अॅड. धनदा कुलकर्णी – गदगकर करतील. वैद्य जेम्स आणि डायमंड, पुणे हे प्रायोजक आहे असे संयोजिका निवेदिता मेहेंदळे यांनी सांगितले.
पुणे फेस्टिव्हल सारख्या सांस्कृतिक महोत्सवात आपल्या वैभवशाली कीर्तन परंपरेचे दर्शन व्हावे यासाठी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी आम्हाला सदैव प्रोत्साहन दिले असे त्यांनी शेवटी सांगितले.
३५व्या पुणे फेस्टिव्हलचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि कोहिनूर ग्रुप हे मुख्य प्रायोजक असून जमनालाल बजाज फौंडेशन, पंचशील, सुमा शिल्प, नॅशनल एग को-ऑर्डिनेशन कमिटी हे सहप्रायोजक आहेत. भारत फोर्ज, कुमार रिअॅलीटी, आहुरा बिल्डर, सिंहगड इन्स्टिट्यूट, बढेकर ग्रुप हे उपप्रायोजक आहेत.