सामाजिक न्यायासाठी सर्वांनी एकत्र यावे- विजय सांपला

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- दि २६ जून २०२१ रोजी राजर्षी शाहू महाराजांची जयंती, सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने ‘विवेक विचार मंच’च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष माननीय विजयजी सांपला यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या परिषदेच्या आयोजनात संपूर्ण महाराष्ट्रातून पन्नासहून अधिक संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींचा व सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश होता. यावेळी अनुसूचित जाती-जमाती व अन्य वंचित घटकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या घटना आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या समस्या यासंबंधी सांगोपांग चर्चा झाली.

याप्रसंगी बोलत असताना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांनी प्रामुख्याने अनुसूचित जाती समुदायातील लोकांवर झालेल्या विविध राज्यातील अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख कला. त्यांनी आयोगाच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

 यावेळी परिषदेच्या वतीने दोन ठराव करण्यात आले. या ठरावाच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमाती घटकांच्या बाबतीत होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि अशा घटनांची दखल घेऊन त्यामागील वास्तविकता समाजासमोर मांडणे, संबंधित आरोपींना कठोर शासन व्हावे याकरिता राज्ययंत्रणेकडे पाठपुरावा करणे, पीडितांना सामाजिक संघटनांकडून व प्रशासनाकडून आर्थिक मदत व कायदेशीर सहकार्य मिळवून देणे आणि संपूर्ण समाजात सामाजिक सलोखा वाढावा याकरिता कार्यरत राहण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच, अनुसूचित जाती-जमाती व अन्य वंचित घटकांमध्ये सकारात्मक कार्य करणाऱ्या संस्था, संघटना व व्यक्ती यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करणे आणि त्यापासून इतरांना प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांचे कार्य समाजासमोर आणण्याचा निश्चय करण्यात आला.

यावेळी ‘विवेक विचार मंच’च्या वतीने “राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार” सुरु करण्यात आला आणि वर्ष २०२१ चा पहिला पुरस्कार हा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड. तेजराव आवारे* ह्यांना देण्यात आला. हा पुरस्कार औरंगाबाद येथील जेष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक डॉ. ऋषिकेश कांबळे, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी, अत्याचारातील पिडीतांना तात्काळ आर्थीक मदत व्हावी या हेतूने “सामाजिक न्याय निधी” उभारण्याची, तसेच वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी “शिकू आनंदे” हे ऍप सुरु करण्याची संकल्पना विवेक विचार मंचाचे कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी मांडली आणि या उपक्रमांमध्ये समाजाने योगदान देण्याचे आवाहन केले.

या परिषदेला राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य श्री सुभाष पारधी, प्राचार्या डॉ. माया गायकवाड, प्राचार्या लताताई मोरे, यांची प्रमुख उपस्थिती राहिली. परिषदेचा समारोप करीत असताना डॉ. संजय तांबट ह्यांनी सामाजिक न्यायाची लढाई समन्वयाने लढावी लागेल, असे प्रतिपादन केले. परिषदेचे प्रास्ताविक मंचाचे समन्वयक सागर शिंदे ह्यांनी, तर सुत्रसंचालन नीलेश धायरकर ह्यांनी केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *