पुणे : जगाला जर शांतता हवी असेल, तर हिंदू जीवनविचारांच्या आधारावरच पुढे जावे लागेल. याचे प्रारूप येत्या पंचवीस वर्षांत संघ विकसित करेल अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले (Sharadrao Dhole) यांनी दिली. रविवारी (ता. २०) आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या समन्वय बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते.
फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडलेल्या या बैठकीला संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ, प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव उपस्थित होते. प्रांतभरातील संघ प्रेरित ४९ संघटनांचे ३२८ कार्यकर्ते व मातृशक्ती बैठकीत सहभागी झाले होते.
संघ शताब्दीनिमित्त महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले. शताब्दी वर्षाचे महत्त्व अधोरेखित करताना शरदराव ढोले म्हणाले की, “वैश्विक पटलावर भारताला विकसित आणि मार्गदर्शक बनायचे असेल, तर हिंदू मूल्याधिष्ठित समाज निर्माण करावा लागेल. त्याची सुरुवात म्हणजे संघ शताब्दी आहे.”
समाजातील सज्जनशक्ती आणि लाखो स्वयंसेवक पंच परिवर्तन जीवनात उतरवतील, तेंव्हा त्यातून संपूर्ण देशात समाज परिवर्तनाची सुरवात होईल, असा विश्वासही ढोले यांनी व्यक्त केला.
डिसेंबर महिन्यात गृह संवाद अभियान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षातील कार्यक्रमांची सुरुवात विजयादशमी (०२ ऑक्टोबर २५) पासून होते आहे. त्यासाठी देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, पश्चिम महाराष्ट्र प्रांतातही मंडल आणि नगर स्तरावर शस्त्रपूजन उत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वाधिक संख्येने गणवेशधारी स्वयंसेवक असतील असे प्रयत्न केले जाणार आहेत. डिसेंबर महिन्यात घरोघरी जाऊन संघ समजावून सांगण्याचे काम गृह संवाद अभियानातून होणार आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात प्रांतभर हिंदू संमेलने आयोजित करण्यात येतील.
समाजाच्या सहभागातून, कुटुंब प्रबोधन, समरसतापूर्ण व्यवहार, पर्यावरणपूरक जीवनशैली, नागरिक शिष्टाचार आणि ‘स्व’-बोध या पंच परिवर्तन बिंदूंवर कार्य केले जाणार आहे.
अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख अतुल अग्निहोत्री यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे दिली आहे.