पुणे- पुण्यातील पेट्रोलचे दर 90.99 प्रतिलिटर तर डिझेलचे दर 80.06 प्रतिलिटर इतके झाले आहेत. त्यामुळे अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे आणि महागाईने ग्रासलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात का वाढ होती आहे आणि हे दर कसे कमी होऊ शकतात हे समजून घेणे आवश्यक आहे.
पहिले कारण म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 60 डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.आणि दुसरे कारण म्हणजे महाराष्ट्र सरकारने एप्रिल महिन्यात सेस म्हणून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपये वाढ केली होती आणि केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात कच्च्या किंमतींच्या घसरणीचा फायदा घेत एप्रिल ते जून या काळात 3 वेळा उत्पादन शुल्क वाढविले आहे.
हा निर्णय झाल्यानंतर दुसर्या दिवशी माध्यमांनी केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी केले तर किंमत खाली येऊ शकते असे वृत्त दिले परंतु, अद्याप अबकारी करात कपात करण्याच्या मुद्द्यावर निर्णय घेण्यासाठी कॅबिनेटमध्ये चर्चाच झालेली नाही.
परंतु विश्वासार्ह सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबद्दल सामान्य नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार यंत्रणेवर काम करत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
2018 मध्ये भाजपा आणि शिवसेना सरकारने मदत कारणासाठी लावलेला दुष्काळ उपकर मागे घ्यावा अशी विनंती ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने (AIPDA) महाराष्ट्र सरकारला केली आहे. यामुळे यूपीएच्या कारकिर्दीत सन 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमत 150 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले असताना त्यावेळी पुण्यात पेट्रोलचे दर प्रतिलिटर 93 रुपये होते याचे साक्षीदार असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना यामुळे त्वरित दिलासा मिळणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारूवाला यांनी म्हटले आहे.