पुरुषी मानसिकतेचा सामना करण्यासाठी एक समाज म्हणून उभे राहणे गरजेचे-लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर


पुणे- आपल्या स्वप्नांचा पाठलाग करीत आज महिला सक्षम बनल्या आहेत, मात्र समाजाची पुरुषप्रधान मानसिकता काही बदललेली नाही. ही मानसिकता बदलायची असेल आणि पुरुषी मानसिकतेचा Masculine mentality सामना करायचा असेल, तर एक समाज म्हणून उभे राहणे गरजेचे आहे, असे मत लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.

फिक्की लेडीज ऑर्गनायजेशन FICCI Ladies Organization अर्थात फ्लो या संस्थेच्या पुणे चॅप्टरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. समाजाची मानसिकता बदलायची असेल तर प्रत्येक महिलेने दुस-या महिलेच्या मदतीसाठी उभे रहायला हवे. याबरोबरच पालकांनी आपल्या मुलाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्या म्हणाल्या. फ्लोच्या राष्ट्रीय अध्यक्षा जानवी फुकन, फ्लो पुणे चॅप्टरच्या अध्यक्षा डॉ. अनिता सणस या देखील या वेळी उपस्थित होत्या. फ्लो पुणेच्या संगीता ललवाणी यांनी लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांची मुलाखत घेत त्यांना बोलते केले.

अधिक वाचा  #'हीट अँड रन' प्रकरण : विशाल अग्रवालला २४ मे पर्यंत पोलिस कोठडी

यावेळी डॉ. कानिटकर म्हणाल्या, “समाजात महिला हीच केवळ अत्याचाराची बळी असते, असे समजले जाते. मात्र अत्याचार करणारा हा ‘सिक मेल माइंड’ अर्थात आजारी पुरुषी मानसिकेचा खरा बळी असतो, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. हे चित्र बदलण्यासाठी समाज म्हणून प्रयत्न होणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात मोठा वाटा हा पालकांचा आहे. हा बदल लगेच होणार नाही पण, या बदलाची सुरुवात होणे महत्त्वाचे आहे आणि यामध्ये समाजाचे योगदान हे महत्त्वाचे ठरेल.”  

प्रत्येक महिलेने तिचे आवडते क्षेत्र कोणते, तिला कोणत्या क्षेत्रात काम करायचे आहे हे स्वत: निवडावे व त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेव्हा ती तिच्या ‘चॉईस’वर ठाम असेल तेव्हा, तिची खरी लढाई सुरु होईल. मात्र त्यासाठी तिने स्वत:चा ‘चॉईस’ ठरवायला हवा. या क्षेत्रात करिअर करायचे हे ठरविल्यानंतर मला पहिला विरोध माझ्या घरा मधूनच झाला पण, जेव्हा मी माझ्या स्वप्नांवर ठाम राहिले, तेव्हा ती लढाई मी जिंकली. घरातूनच सुरुवातीला झालेल्या अशा लढायांमुळे मी आयुष्यात पुढील अनेक मोठ्या समस्यांचा सामना करू शकले, असेही त्या म्हणाल्या.

अधिक वाचा  मस्ती असेल तर विधानसभेत नाव घेवून पाडू- मनोज जरांगे पाटील

कोविड १९ च्या या आव्हानात्मक काळात ‘वंदे भारत’ मिशन दरम्यान आपल्या सैन्य दल, हवाई दल आणि नौदलाने अभूतपूर्व अशा एकीची झलक देशाला दाखविली. सैन्याबरोबरच देशातील नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी आम्ही अनेक आघाड्यांवर लढलो, यादरम्यान २८ कोविड रुग्णालयांची उभारणी दलाने केली असे डॉ. कानिटकर यांनी सांगितले.

या क्षेत्रात काम करीत असताना अनेक महिलांनी मला प्रेरित केले, असे सांगत डॉ. कानिटकर यांनी त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. घराची जबाबदारी सांभाळताना कुटुंबाची मोलाची साथ मिळाली. आता निवृत्तीनंतर पुन्हा पुण्यात रहायला येणार असून निवृत्ती नंतर करावयाच्या गोष्टींची मी एक ‘बकेट लिस्ट’ बनविली असून मी त्याबाबत उत्साही असल्याचे त्यांनी सांगितले.    

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love