पुणे(प्रतिनिधि)–– कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मारणेला सांगली कारागृहात हलवले जात असताना पोलिसांच्या उपस्थितीत महामार्गावरील एका ढाब्यावर मटण बिर्याणी खाऊ घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.
गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात चार जणांची नावे आहेत. .
गजा मारणे सध्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA) तुरुंगात असून त्याच्या टोळीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला पुण्यातील येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात हलवले जात असताना, साताऱ्याजवळील प्रसिद्ध ‘कणसे ढाब्या’वर पोलिस व्हॅन थांबवून त्याच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी जेवण केले. त्याच वेळी, दोन फॉर्च्युनर, एक थार आणि अन्य एका वाहनातून आलेले गजा मारणेचे समर्थक ढाब्यावर पोहोचले आणि त्यांनी मारणेला बिर्याणी खाऊ घातली. हा प्रकार ढाब्यावरच्या सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे कैद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
साताऱ्याजवळ महामार्गावर असलेल्या कणसे ढाब्यावर पोलिस व्हॅनने विश्रांती घेतली. याच दरम्यान गजा मारणेचे समर्थक सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण ऊर्फ पांड्या मोहिते हे तीन जण तेथे दाखल झाले. त्यांनी मारणेला मटण बिर्याणी पुरवली आणि काही काळ संवाद साधला. पोलिसांच्या नजरेसमोर हा सर्व प्रकार घडला, मात्र त्यात हस्तक्षेप करण्यात आला नाही. यापैकी विशाल धुमाळ याच्यावर खुनाचा गुन्हा असून, पांड्या मोहिते हा सांगलीतील गजा मारणेचा ‘शूटर’ असल्याची माहिती आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केल्यानंतर, दोषी आढळलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात आली. या कारवाईत गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आले आहे.
गजा मारणे याला १९ फेब्रुवारी रोजी कोथरूड येथे शिवजयंती कार्यक्रमात सॉफ्टवेअर अभियंत्यावर हल्ला केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर २४ फेब्रुवारीला त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते.
गजा मारणेला ढाब्यावर भेटलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत आहे.
बाळकृष्ण मोहितेस सांगलीतून अटक
गजानन मारणे याला स्पेशल ट्रीटमेंट देण्याच्या प्रकरणात चार पोलिसांचे निलंबन करण्यात आले असतानाच या प्रकरणात गजाचा मुख्य साथीदार बाळकृष्ण ऊर्फ पांडया लक्ष्मण मोहिते याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने सांगली येथून अटक केली आहे.
येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात गजानन मारणे यास घेऊन जात असताना त्याला वाटेमध्ये मटण बिर्याणी खाऊ घातल्याप्रकरणी मोहिते याला अटक करण्यात आलेली आहे. ‘भाऊला मटण बिर्याणी पाहिजे’ असे बंदोबस्तावरील पोलिसांना सांगून त्यासाठी खास बिर्याणी आणून देणारा बाळकृष्ण मोहिते हा गजानन मारणे याचा एकदम विश्वासू साथीदार आहे. मारणे याचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा राईट हँड म्हणून तो ओळखला जातो. बुधवारी त्यास न्यायालयात हजर केले असता १७ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
गैरप्रकार खपवून घेणार नाही : पोलीस आयुक्त
याबाबत बोलताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, कोणत्याही गुंडाने कायद्यासोबत दुर्व्यहार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर त्याचपद्धतीने कडक कारवाई केली जाईल. गजानन मारणे याच्यावर मोक्काची कडक कारवाई केली आहे. त्याच्यासोबत काही जणांनी साथ दिल्याचा प्रकार उघडकीस आल्यावर एक अधिकारी व चार पोलीस कर्मचारी यांचे निलंबन करण्यात आले आहे. एपीआय सूरज राजगुरु, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे व पोलीस शिपाई राहुल परदेशी अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणात मोक्का गुन्हयातील आरोपीला प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मदत करणे हा गुन्हाच आहे. गुन्हयात आरोपींनी वापरलेल्या फॉर्च्युनरसारख्या गाडया जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हेगारीचे कुणी उदात्तीकरण करत असेल, तर त्याबाबत पोलीस कडक कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला.