पुणे- कारवाईसाठी वाहतूक पोलीस थांबवत असताना गाडी थांबवत असताना वाहतूक पोलिसाला किमान एक किलोमीटरपर्यंत मोटारीच्या बोनेटवर बसवून गाडी पळवण्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड मध्ये घडला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. दरम्यान, कायदा तोडणाऱ्यांना अभय दिले जाणार नाही. त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
आबा विजय सावंत असे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर युवराज किसन हातवडे (रा. पिंपळे निलख) असे माथेफिरू वाहन चालकाचे नाव आहे.
पोलीस कर्मचारी आबा सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सायंकाळी चिंचवडगाव परिसरातील अहिंसा चौक (एल्प्रो चौक) परिसरात चिंचवड वाहतूक शाखेतील पोलीस नाईक आबा सावंत हे मास्क न लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपी युवराज हातवडे हा त्याच्या कारमधून (एमएच 01 / वाय 8837) तिथे आला. त्याने तोंडाच्या खाली मास्क घेतल्याने पोलिसांनी त्यास कार बाजूला घेण्यास सांगितले.
कार बाजूला घेतो असे म्हणून तो पळून जाण्याचा प्रयत्न करून लागला. त्यावेळी कारच्या समोर पोलीस कर्मचारी सावंत हे होते. तो कार पुढे घेत असताना सावंत यांचा पाय कारच्या बोनेटमध्ये अडकला. त्याने आरोपी युवराज याला सांगूनही त्याने कार पुढे घेतली.
जीव वाचविण्यासाठी सावंत हे कारच्या बोनेटवर बसले. कारच्या वरील बाजूस असलेल्या ऍन्टीनाला धरले. मात्र माथेफिरू कार चालकाने त्याही स्थितीत कार तशीच सुसाट पुढे पळवली. जवळपास एक किलोमीटर हा थरार सुरू होता. रस्त्यावरील दुचाकी वाहन चालकांनी तसेच वाहतूक पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. तरीही कार चालकाने कार थांबविली नाही.
त्यानंतर एक दुचाकी चालकाने कारच्या पुढे जाऊन पुढच्या कार चालकाला गाडी थांबविण्याची विनंती केली. त्यानुसार पुढील वाहन चालकाने कार थांबविल्यानंतर माथेफिरू वाहन चालकाने कार थांबविली. दरम्यान चिंचवड पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी माथेफिरू कार चालकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आत्तापर्यंत पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांना शिस्तीची सवय नव्हती. आता लहान-मोठ्या चुकांवर कारवाई केली जात आहे. हा प्रकार त्यांना सहन होत नाही, त्यामुळे ते आता आक्रमक होत आहेत. शहरातील सांगवी आणि चिंचवड परिसरात घडलेल्या घटनांबाबत आरोपींना अटक करण्यात आली आहे. कायदा तोडणार असाल तर, तुमच्यावर कारवाई होणार, असा इशारा पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरवासीयांना दिला आहे.